रोनाल्डोला यंदाही 'बॉलन डीऑर' पुरस्कार 

वृत्तसंस्था
Saturday, 9 December 2017

"बॉलन डीऑर' म्हणजे काय? 
फ्रान्सच्या फुटबॉल मासिकाकडून हा पुरस्कार दिला जातो. 1956 मध्ये या पुरस्काराची सुरवात झाली आणि पहिला मान इंग्लंडच्या स्टेनली मॅथ्यूज यांनी मिळवला. फुटबॉल पत्रकारांच्या मतदानानंतर विजेता निश्‍चित केला जात असतो. 2010 ते 2015 मध्ये फिफाशी करार होऊन "बॉलन डीऑर' म्हणजेच फिफाच्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार दिला जात होता; परंतु 2016 पासून पुन्हा "बॉलन डीऑर' आणि फिफाचे दोन वेगवेगळे पुरस्कार दिले जाऊ लागले.

पॅरिस : पोर्तुगाल आणि रेयाल माद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला पाचव्यांदा प्रतिष्ठेचा "बॉलन डीऑर' पुरस्कार मिळाला आहे. त्याने हा पुरस्कार पाच वेळा जिंकल्याने लिओनेल मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. 

रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवताना यंदाही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मेस्सीला पुन्हा एकदा मागे टाकले. यंदा तिसरा क्रमांक ब्राझीलच्या नेमारने मिळवला. 32 वर्षीय रोनाल्डो गत मोसमात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या या कामगिरीमुळे रेयालने चॅंपियन्स लीगचे विजेतेपद आपल्याकडेच राखले होते; तसेच स्पॅनिश लीगचेही विजेतेपद मिळवले होते. 

या पुरस्कारामुळे मी निश्‍चितच फार आनंदी आहे. अशी कामगिरी आणि असा पुरस्कार प्रत्येक वर्षी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. असे रोनाल्डोने आयफेल टॉवरमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात सांगितले. गतवर्षी रेयाल माद्रिदने मिळवलेल्या विजेतेपदामुळे माझा मार्ग सुकर झाला, असेही तो म्हणाला. 

रोनाल्डोने यंदाचा फिफा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचाही बहुमान मिळवला आहे. "बॉलन डी'ऑर' हा पुरस्कार त्याने या अगोदर 2008, 2013, 2014 आणि 2016 मध्ये मिळवलेला आहे. गत मोसमात त्याने रेयालकडून विविध स्पर्धांमध्ये मिळून 42 गोल केले, तर युरोपियन विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत 15 वेळा गोलजाळ्याच चेंडू मारले. 

अव्वल श्रेणीचा असाच खेळ पुढील काही वर्षे खेळत राहायचे आहे. मेस्सीबरोबरची ही मैदानातली स्पर्धा अशीच सुरू ठेवायची आहे. पुढील वर्षीही सर्वोत्तम खेळाडूचे पुरस्कार मिळवत राहायचे आहे. 
- ख्रिस्तियानो रोनाल्डो 

"बॉलन डीऑर' म्हणजे काय? 
फ्रान्सच्या फुटबॉल मासिकाकडून हा पुरस्कार दिला जातो. 1956 मध्ये या पुरस्काराची सुरवात झाली आणि पहिला मान इंग्लंडच्या स्टेनली मॅथ्यूज यांनी मिळवला. फुटबॉल पत्रकारांच्या मतदानानंतर विजेता निश्‍चित केला जात असतो. 2010 ते 2015 मध्ये फिफाशी करार होऊन "बॉलन डीऑर' म्हणजेच फिफाच्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार दिला जात होता; परंतु 2016 पासून पुन्हा "बॉलन डीऑर' आणि फिफाचे दोन वेगवेगळे पुरस्कार दिले जाऊ लागले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cristiano Ronaldo wins fifth Ballon d’Or to equal Lionel Messi’s record