क्रोएशिया आणि खेळाडूंबद्दल 'हे' आहे का माहिती?

हर्षदा कोतवाल
Sunday, 15 July 2018

1950 नंतर फुटबॉल विश्वकरंडकात अंतिम फेरी गाठणाऱ्या देशांपैकी क्रोएशिया हा सर्वात लहान देश आहे. 1950 मध्ये उरुग्वेने फुटबॉल विश्वकरंडकात अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर क्रोएशियाने फक्त तीन फुटबॉल विश्वकरंडक खेळले आहेत. परंतू 2002, 2006 आणि 2014 या तिन्ही वेळेस त्यांना साखळीतूनच माघारी जावे लागले होते. 

काही दिवसांपूर्वी आपल्यापैकी अनेक जणांना क्रोएशिया या देशाबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र सध्या सारे जग फुटबॉलच्या निमित्ताने त्यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. क्रोएशियाने अवघ्या जगाला नवल वाटावे, अशी कामगिरी करत थेट फुटबॉल विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने यापूर्वीच साऱ्या क्रीडाप्रेमींची मनं जिंकून क्रोएशियाच्या इतिहासात आपली नावे सुवर्ण अक्षरात कोरली आहेत.  

आकाराने आणि लोकसंख्येने पुण्यापेक्षाही लहान असलेल्या क्रोएशियाने फुटबॉल विश्वकरंडकात भल्या भल्या देशांना धुळ चारत अंतिम फेरी गाठली आहे. फक्त 42 लाख लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या महायुद्धाच्या झळा सहन करत आज इथवर पोहोचला आहे. 1998 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या फुटबॉल विश्वकरंडकात क्रोएशियाने विश्वकरंडकात पदार्पण केले आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. 1998 च्या फुटबॉल विश्वकरंडकातील उपांत्य सामन्यात त्यांना फ्रान्सकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात या पराभवाची परतउेड करण्यास क्रोएशियाचे खेळाडू नक्कीच उत्सुक असतील. 

1950 नंतर फुटबॉल विश्वकरंडकात अंतिम फेरी गाठणाऱ्या देशांपैकी क्रोएशिया हा सर्वात लहान देश आहे. 1950 मध्ये उरुग्वेने फुटबॉल विश्वकरंडकात अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर क्रोएशियाने फक्त तीन फुटबॉल विश्वकरंडक खेळले आहेत. परंतू 2002, 2006 आणि 2014 या तिन्ही वेळेस त्यांना साखळीतूनच माघारी जावे लागले होते. 

क्रोएशिया संघातील अनेक खेळाडूंनी  1991-1995 मध्ये झालेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या झळा सोसल्या आहेत. क्रोएशियाचा स्टार खेळाडू लुका मॉड्रिच हा फक्त सहा वर्षांचा असताना क्रोएशियाच्या मध्यात असलेले त्याचे गाव मॉड्रिची हे नागरी युद्धात होरपळले गेले होते. 1991मध्ये सर्बियाच्या सैन्याने त्याचे घर जाळून टाकले ज्यामुळे त्याला शहर सोडून जावे लागले. हवेतून होणारा ग्रेनाईडचा मारा, चारही बाजूंनी सतत होणारा गोळीबार, पावलागणीक लावलेले भूसुरुंग या सगळ्यातून दूर जाण्यासाठी मॉड्रिच फुटबॉल खेळू लागला. 

क्रोएशियाच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे मॅंड्झुकीच आणि रॅकिटिच यांचे बालपण जर्मनी आणि स्विर्त्झलंडमध्ये गेले. क्रोएशिया संघाकडून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर रॅकिटिचला स्वित्झर्लंडमधून जीवे मारण्याच्या धमक्याही येत असत.  

अशा प्रचंड कठीण परिस्थितून मार्ग शोधत क्रोएशियाचा संघ आज फुटबॉल विश्वकरंडकतील त्यांचा पहिली अंतिम सामना खेळणार आहे. संघातील सर्व खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे फक्त त्यांच्या देशवासीयांनांच नव्हे तर साऱ्या जगाला आप्रुप वाटावे अशी कामगिरी त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia into Football world cup final play against France