esakal | क्रोएशियाचे मध्यरक्षक इंग्लंडची डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

Croatia vs England Football World Cup Semi Final

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे.

क्रोएशियाचे मध्यरक्षक इंग्लंडची डोकेदुखी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे.

स्पर्धेतील सर्वोत्तम मध्यरक्षकात क्रोएशियाची गणना होते. बार्सिलोनाचा इवान राकितिक आणि रेयाल माद्रिदचा प्लेमेकर ल्युका मॉद्रिक यांच्यासमोर इंग्लंडचा एकमेव सेंट्रल डिफेन्सिव मिडफिल्डर जॉर्डन हेंडरसन कितपत टिकाव धरू शकेल हा प्रश्‍न आहे. साउथगेट यांचा आक्रमण आणि बचाव हा हॅरी केन याच्या भोवताली आणि पाठी असलेल्या आक्रमक तसेच मध्यरक्षकांवर अवलंबून असेल.

जेसी लिंगार्ड, डेल अली आणि रहीम स्टर्लिंग या प्रामुख्याने आक्रमक खेळाडूंवर आक्रमणे रोखण्याची जबाबदारी आहे. आत्तापर्यंत ही चाल यशस्वी ठरली आहे. हेंडरसनला या आक्रमक बचावपटूंची चांगली साथ लाभली आहे; पण राकितिक आणि मॉद्रिक यांच्या साथीला जेव्हा आंद्रेज क्रामारिक आणि मारिओ मॅंदझुकिक येतात, त्या वेळी क्रोएशिया सरस असल्याचे कोणीही मान्य करेल.

साउथगेट यांनी सरावात एरिक डायर याला हेंडरसनच्या साथीला खेळवण्याचा प्रयोग केला असल्याचे समजते. हा प्रयोग माफक यशस्वी झाला; पण प्रत्यक्ष लढतीच्या वेळी आत्तापर्यंत जमलेला सूर बिघडला जाऊ शकेल; तसेच संघाचा समतोल बिघडतो. इंग्लंडच्या चालीवरही मर्यादा येतील, असे मानले जात आहे. अर्थात साउथगेट यांच्यावर इंग्लंड खेळाडूंचा कमालीचा विश्‍वास आहे. कोलंबिया आणि स्वीडनच्या तुलनेत क्रोएशिया नक्कीच ताकदवान आहेत.

दोन्ही बगलांतून प्रतिहल्ले
क्रोएशिया दोन्ही बगलांतून अचानक वेगवान चाली रचण्यात प्रभावी आहेत. या परिस्थितीत बचावपटूंना साथ देण्यासाठी मध्यरक्षक, तसेच आक्रमक बचावपटूंना जास्त काम करावे लागेल. हेंडरसनच्या साथीला दिएरला खेळवले तर हे काम सोपे होईल, पण त्यासाठी जेसी लिंगार्ड, डेल अली आणि रहीम स्टर्लिंग यापैकी एकास वगळणे भाग पडेल. या तिघांपैकी स्टर्लिंगच माफक अपयशी आहे. त्यापेक्षाही या तिघांची जमलेली भट्टी बिघडवण्याचा धोकाही असेल.