इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार फायनल: डेव्हिड बेकहम

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

अंतिम सामना अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होईल. विजेतेपदासाठी माझी पसंती नक्कीच इंग्लंडला असेल मात्र हे माझ्या देशाबद्दलचे प्रेम आहे. इंग्लंडच्या संघातील खेळाडू तरुण असून त्यांना अजून विश्वकरंडकात खेळण्याचा अनुभव नसल्याने अंतिम सामन्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर आहे.

बिजिंगः इंग्लडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहमने फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना अशी लढत होईल असा अंदाज वर्तविला आहे. चीनमध्ये एका कार्यक्रमासाठी आला असताना त्याने हे मत मांडले. 

इंग्लंडने पहिल्या सामन्यात ट्युनिशियाचा 2-1 असा पराभव केल्याने त्यांच्या बाद फेरीच्या आशा वाढलेल्या आहेत.  इंग्लंडच्या संघाने 2006 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी बेकहम संघाचा कर्णधार होता. मात्र त्यानंतर इंग्लंड संघाला एकदाही उपांत्य फेरीत प्रवेश करता आलेला नाही. इंग्लंडने 1966 साली फक्त एकदाच विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली होती जेव्हा त्यांनी जर्मनीला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. 

चीनमधील सर्वात मोठ्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना बेकहमने म्हणाला, मला असे वाटते की, अंतिम सामना अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होईल. विजेतेपदासाठी माझी पसंती नक्कीच इंग्लंडला असेल मात्र हे माझ्या देशाबद्दलचे प्रेम आहे. इंग्लंडच्या संघातील खेळाडू तरुण असून त्यांना अजून विश्वकरंडकात खेळण्याचा अनुभव नसल्याने अंतिम सामन्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Beckham predicts England-Argentina final