esakal | इजिप्तच्या अपयशाचे संसदेमध्ये पडसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Egypt's failures effect in Parliament

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सहभाग कोणत्याही संघासाठीच नव्हे, तर देशासाठीसुद्धा जीवन-मरणाचा विषय असतो. "अ' गटात तळात राहिलेल्या इजिप्तसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्यांनी तिन्ही सामने गमावले. साहजिकच याचे संसदेत पडसाद उमटले. या कामगिरीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. क्रीडा समितीने संघाच्या कामगिरीवर टीका केली. संघाचे प्रतिनिधित्व अपमानास्पद ठरले. त्यातही सौदी अरेबियाविरुद्धचा पराभव मानहानिकारक ठरला, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली

इजिप्तच्या अपयशाचे संसदेमध्ये पडसाद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सहभाग कोणत्याही संघासाठीच नव्हे, तर देशासाठीसुद्धा जीवन-मरणाचा विषय असतो. "अ' गटात तळात राहिलेल्या इजिप्तसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्यांनी तिन्ही सामने गमावले. साहजिकच याचे संसदेत पडसाद उमटले. या कामगिरीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. क्रीडा समितीने संघाच्या कामगिरीवर टीका केली. संघाचे प्रतिनिधित्व अपमानास्पद ठरले. त्यातही सौदी अरेबियाविरुद्धचा पराभव मानहानिकारक ठरला, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. इजिप्त फुटबॉल संघटनेवर गंभीर पायमल्लीचा ठपका ठेवण्यात आला. अर्जेंटिनाचे हेक्‍टर क्‍युपर इजिप्तचे प्रशिक्षक आहेत. 2015 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 1990 नंतर प्रथमच इजिप्तने विश्‍वकरंडक पात्रता फेरी गाठली, तर गेल्या वर्षी आफ्रिकन नेशन्स कपमध्ये अंतिम फेरी गाठली. यानंतरही क्‍युपर यांचे भवितव्य अनिश्‍चित आहे. 

पेरूच्या चाहत्यांचा ठसा 
पेरूचा संघ 1978च्या स्पर्धेनंतर विश्‍वकरंडकास प्रथमच पात्र ठरला. दक्षिण अमेरिकेतील या संघाने कलात्मक कौशल्य आणि तांत्रिक गुणवत्तेच्या जोरावर ठसा उमटविला. डेन्मार्कचे प्रशिक्षक एज हॅरैडे यांनी आपला संघ आगेकूच करण्यात सुदैवी ठरला असे मान्य करीत पेरूच्या संघाविषयी सहानुभूती दर्शविली. पेरूच्या चाहत्यांनीही असाच ठसा उमटविला. लढत सुरू होण्यापूर्वी ते स्टेडियममध्ये जमा व्हायचे. "कॉंटिगो पेरू' या गीताचे ते भावपूर्ण सादरीकरण करायचे. लाकडी खोक्‍याचा ड्रम आणि गिटार वाजवीत ते नृत्य करीत ताल धरत. हे गीत 1978च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी लिहिले गेले होते. त्यानंतर पेरूची विश्‍वकरंडकाची प्रदीर्घ प्रतीक्षा या स्पर्धेपर्यंत लांबली. त्यामुळे हेच गीत कायम ठेवण्यात आले. 

नायजेरियाचा अपेक्षाभंग 
अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम क्षणी विजय दुरावल्यामुळे नायजेरियाच्या चाहत्यांचा घोर अपेक्षाभंग झाला. आर्थिक राजधानी लागोसमध्ये स्क्रीनवर सामना पाहिलेला केलेचुक्वू एमग्बीयाहुरैकी म्हणाला, की "आम्ही दोन संधी दवडल्यामुळे हृदयभंग झाला.' स्पर्धेतील एका सर्वाधिक खडतर गटात समावेश असला तरी नायजेरियाच्या चाहत्यांना बऱ्याच आशा होत्या. रिटेल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या फेमी ओगुन्डेजीने पेनल्टी न देण्याच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला. केनेथ उझोन्वान्ने नामक कलाकाराची प्रतिक्रिया मात्र "वेगळी' होती. "आम्ही देवाविरुद्ध लढू शकत नाही. देवाला असेच हवे होते,' असे तो म्हणाला.