युरोप-दक्षिण अमेरिका संघर्षास नवे वळण

वृत्तसंस्था
Thursday, 5 July 2018

थोडक्‍यात महत्त्वाचे 
- युरोप किंवा दक्षिण अमेरिकन व्यतिरिक्त एकही संघ उपांत्यपूर्व फेरीत नसण्याची ही गेल्या सात स्पर्धांत चौथी वेळ. 
- खेळात आगळे प्रयोग करणारे युरोपियन आणि भक्कम बचावास पसंती देणारे दक्षिण अमेरिकन असाच सामना असतो. 
- दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हे खेळाचा आनंद देणारे, तर उरुग्वे भक्कम बचावाच्या जोरावर विजयाचा प्रयत्न करणारे. 
- या दोन देशांचे प्रतिस्पर्धी असलेले बेल्जियम तसेच फ्रान्स हे आक्रमणास पसंती देणारे. 
- उरुग्वेने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केले, तर फ्रान्स लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनावर भारी. 

सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला संघ किमान अंतिम फेरीत असेल हे जवळपास नक्की आहे. 

विश्‍वकरंडकाच्या विजेतेपदाचे कायम प्रबळ दावेदार असलेले जर्मनी, स्पेन तसेच अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच बाद झाले आहेत. स्पर्धेत अनपेक्षित निकालांची मालिका सुरू आहे, त्यामुळे कागदावरील ताकद बघितली तर स्पर्धेच्या बाद फेरीचा ड्रॉ असमतोल भासत आहे. 

1966 मध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर इंग्लंडने कधीही अंतिम फेरी गाठलेली नाही, तर त्यांची लढत होणारे स्वीडन 1958 चे उपविजेते आहेत, पण त्यानंतर अंतिम फेरी त्यांच्यासाठी दूरच आहे. इंग्लंड - स्वीडन लढतीतील विजेता संघ लढणार आहे तो क्रोएशिया-रशिया यांच्यातील विजेत्याशी. अस्तंगत सोव्हिएत संघराज्याने 1966 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती; पण त्यानंतर सोव्हिएत असो अथवा रशिया या कामगिरीची पुनरावृत्ती झालेली नाही. क्रोएशियाने 1998 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता; पण त्यांच्याकडूनही या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा तज्ज्ञांना नव्हती. 

50 वर्षांत विजेतेपदापासून खूपच दूर असलेल्या चार संघांतील एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर त्याच वेळी तीन माजी विजेत्यांपैकी एक जण यासाठी प्रयत्न करेल. त्यांची गणिते जागतिक क्रमवारीत तिसरा असलेला बेल्जियम बिघडवू शकेल. बेल्जियमची उपांत्यपूर्व लढत पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलविरुद्ध आहे. त्याच वेळी 1998 चे विजेते फ्रान्स आणि दोनदा स्पर्धा जिंकलेले उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत लढतील. 

स्पर्धेचा हा भिन्न ड्रॉ पाहून इंग्लंड चाहते खूष असतील. बेल्जियमविरुद्ध पराजित होण्याची चाल आत्तापर्यंत यशस्वी ठरल्याचे त्यांना समाधान आहे. अर्थात इंग्लंडसमोरील आव्हान सोपे नाही. स्वीडनची खेळाची शैली इंग्लंडला सतावणारी आहे, असेच तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात, इंग्लंड असो वा स्वीडन त्यांच्या चाहत्यांनी आपला संघ उपांत्य फेरीत असेल, अशी अपेक्षा बाळगली नव्हती हेच रशिया किंवा क्रोएशियाबाबतही म्हणता येईल. 

थोडक्‍यात महत्त्वाचे 
- युरोप किंवा दक्षिण अमेरिकन व्यतिरिक्त एकही संघ उपांत्यपूर्व फेरीत नसण्याची ही गेल्या सात स्पर्धांत चौथी वेळ. 
- खेळात आगळे प्रयोग करणारे युरोपियन आणि भक्कम बचावास पसंती देणारे दक्षिण अमेरिकन असाच सामना असतो. 
- दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हे खेळाचा आनंद देणारे, तर उरुग्वे भक्कम बचावाच्या जोरावर विजयाचा प्रयत्न करणारे. 
- या दोन देशांचे प्रतिस्पर्धी असलेले बेल्जियम तसेच फ्रान्स हे आक्रमणास पसंती देणारे. 
- उरुग्वेने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केले, तर फ्रान्स लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनावर भारी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Europe-South America strikes new conflicts