फिफा २०१८: यजमान रशियाची विजयी सलामी!

केदार लेले (लंडन)
Friday, 15 June 2018

मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना.

मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना.

उद्घाटन सोहळा...
रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा वर्ल्डकपला सुरुवात झाली. रशियन संस्कृती सादर करण्यासाठी कलाकार उद्घाटनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. सरस कलाप्रकार सादर करून त्यांनी स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. दिमाखदार लुझ्निकी  स्टेडियमवर एकापाठोपाठ एक साकारलेले नयनरम्य देखावे, फुटबॉलप्रेमींचा जल्लोष आणि त्यांच्या सळसळत्या उत्साहात भर घालणारं संगीत; रॉबी विल्यम्स आणि रशियाची सुप्रसिद्ध गायिका आयडा गॅरीफुलिना या जगप्रसिद्ध कलाकारांनी सादर केलेले लाइव्ह परफॉर्मन्सेस आणि पहिल्या सामन्याविषयी शिगेला पोहोचलेली उत्कंठा साऱ्या जगानं अनुभवली.

रशियाच्या विजयात चमकले चेरेशेव्ह, ज्युबा आणि गोलोविन
सलामीचा सामना यजमान रशियाचा असल्याने रशियन फुटबॉलप्रेमींची प्रतिष्ठाच पणाला लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात गेल्या सात सामन्यात रशियाच्या खराब कामगिरीमुळे सगळ्यांच्याच हृदयाची धडधड जास्तच वाढली होती.

सामन्याच्या १२व्या मिनिटाला रशियाच्या गझिनस्कीने गोल करत रशियाचे खाते उघडले. त्यानंतर रशियाने मागे वळून पाहिले नाही. २४व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या चेरेशेव्हने दुसरा गोल केला. त्यामुळे मध्यंतराला रशियाकडे २-० अशी आघाडी होती.

ज्युबाला प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह यांचा सलाम
उत्तरार्धात रशियाने आक्रमण आणखी प्रखर केले. बदली खेळाडू म्हणून ७०व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या आर्टेम ज्युबाने अवघ्या ८९ सेकंदात गोल केला. वर्ल्डकपच्या इतिहासात बदली खेळाडूने केलेला हा दुसरा जलद ठरला. हा गोल करताच रशियन प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह यांनी ज्युबाला सलाम ठोकला.

सामना संपताना इंज्युरी टाईममध्ये डाव्या पायाची किमया दाखवत चेरेशेव्ह (९० + १व्या मिनिटाला) आणि उत्कृष्ठ फ्री-किक द्वारे गोलोविन (९० + १व्या मिनिटाला) यांनी गोल नोंदवत, आव्हानातील हवा गेलेल्या सौदी अरेबियाच्या जखमेवर मीठ चोळले. सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाचा धुव्वा उडवत रशियानं सामना ५-० असा जिंकला.

आजच्या लढती
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवार, १५ जून) इजिप्त विरुद्ध उरुग्वे, मोरोक्‍को विरुद्ध इराण आणि स्पेन विरुद्ध पोर्तुगल अशा लढती रंगतील.
स्पेन विरुद्ध पोर्तुगल ही लढत स्पेन विरुद्ध रोनाल्डो अशी संबोधली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifa world cup 2018 Russia kick-starts campaign with a thumping win

फोटो गॅलरी