विचित्र स्वयंगोलने स्विस विजय हुकला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

कोस्टारिकाविरुद्ध स्वित्झर्लंडला भरपाई वेळेत पेनल्टीवर विचित्र परिस्थितीत स्वयंगोलचा फटका बसला. त्यामुळे निर्णायक विजय हुकला, पण एका गुणासह स्विस संघाने बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. 
 

निझनी नोवगो रोड - कोस्टारिकाविरुद्ध स्वित्झर्लंडला भरपाई वेळेत पेनल्टीवर विचित्र परिस्थितीत स्वयंगोलचा फटका बसला. त्यामुळे निर्णायक विजय हुकला, पण एका गुणासह स्विस संघाने बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. 

पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत स्विस तेवढा प्रभाव पाडू शकले नाहीत. ब्राझीलने सर्बियाला हरविणे त्यांच्या पथ्यावर पडले. आव्हान यापूर्वीच संपलेल्या कोस्टारिकाने चिवट खेळ केला. ब्लेरीम डीझेमैलीने खराब मार्किंगचा फायदा उठवीत 31व्या मिनिटाला स्वित्झर्लंडचे खाते उघडले. केंडॅल वॉटसन याने उत्तरार्धात कोस्टारिकाला बरोबरी साधून दिली. दोन मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू जोसेप द्रमिचने स्वित्झर्लंडला आघाडीवर नेले होते. डेनिस झकारियाच्या मैदानालगत आलेल्या क्रॉस पासवर त्याने गोल केला. त्याआधी त्याने हेडिंग केलेला चेंडू गोलपोस्टला लागला होता. 

स्विस ही आघाडी अबाधित राखतील असे वाटत होते, पण भरपाई वेळेत नाट्य घडले. तिसऱ्या व एकूण 93व्या मिनिटाला जोएल कॅंपबेल याला पेनल्टी क्षेत्रात पाडण्यात आले. त्यामुळे कोस्टारिकाला पेनल्टी बहाल करण्यात आली. ब्रायन रुईझच्या फटक्‍यात अचूकता नव्हती; पण क्रॉसबारला लागून चेंडू स्विस गोलरक्षक यान सॉम्मेर याच्या डोक्‍याच्या मागील भागाला लागून नेटमध्ये गेला. 

स्विस संघासमोर आता स्वीडनचे आव्हान असेल. कोस्टारिकाने 2014च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती; पण या वेळी त्यांना जेमतेम खाते उघडता आले.

Web Title: FIFA World Cup: Switzerland strike late to sink Serbia 2-1

टॅग्स