फुटबॉल मानांकनाच्या प्रगतीवर समाधानी राहणार नाही - छेत्री

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 April 2017

मुंबई - "फिफा' मानांकन क्रमवारीत भारताने 101व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल कर्णधार आणि स्टायकर सुनील छेत्रीने अभिमान आणि गर्व व्यक्त केला; पण त्याचबरोबर एवढ्यावरच समाधान न मानण्याचा सल्लाही सहकाऱ्यांना दिला आहे.

मुंबई - "फिफा' मानांकन क्रमवारीत भारताने 101व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल कर्णधार आणि स्टायकर सुनील छेत्रीने अभिमान आणि गर्व व्यक्त केला; पण त्याचबरोबर एवढ्यावरच समाधान न मानण्याचा सल्लाही सहकाऱ्यांना दिला आहे.

युएफा चॅम्पियन्स करंडक आज मुंबईत आणण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छेत्री उपस्थित होता. त्या वेळी बोलताना त्याने टीम इंडियाच्या प्रगतीवर गर्व व्यक्त केला. इतकी प्रगती आम्ही करू शकतो, असे गेल्या दोन महिन्यांत वाटले नव्हते, पण आम्ही प्रयत्न करत होतो. एकदम 40 संघांना मागे टाकले, यामध्ये गुणांकनाचे मोजमापही महत्त्वाचे ठरले, असे सांगितले.

छेत्री पुढे म्हणतो, जर तुम्ही मायदेशात तुमच्यापेक्षा कमजोर असलेल्या संघाकडून पराभूत झालात, तर एकदम 30-40 क्रमांकाने तुम्ही पाठीमागे जाता. त्याच वेळी इतर संघांच्याही कामगिरीवरही तुमचे स्थान पुढे-मागे होत असते. गेल्या काही महिन्यांत आम्ही 13 पैकी 11 सामने जिंकलो, ही सर्वांत मोठी प्रगती आहे; परंतु त्यावर समाधानी राहून चालणार नाही.

छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारताने म्यानमारवर 1-0 असा विजय मिळवला होता. अनेक दशकांनंतर ही विजयी कामगिरी करता आली होती.

तो सामना सोपा नव्हता, त्यामुळे मिळवलेल्या विजयाचे महत्त्व अधिक आहे; पण आता खरी कसोटी पुढे आहे. किर्गीस्थानविरुद्ध होम आणि अवे अशा दोन लढती खेळायच्या आहेत. त्यानंतर मकाऊविरुद्ध दोन सामने आहेत. या दोन देशांमधला सामना 69 व्या मिनिटांपर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिला होता, यावरून या दोन्ही संघांची ताकद लक्षात येते, असे छेत्रीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Football Top of progress will not be satisfied