राजकीय कैद्यांच्या वेदनांवर विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे फुंकर

वृत्तसंस्था
Sunday, 1 July 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन म्हणजे आनंदाची पर्वणी. 1978ची स्पर्धा अर्जेंटिनात झाली तेव्हा मात्र हजारो नागरिक फुटबॉलचा आनंद लुटण्याच्या अवस्थेत नव्हते. तेव्हा अर्जेंटिनात हुकूमशाही होती. त्या वेळी अनेकांना राजकीय कैदी म्हणून गजाआड करण्यात आले. यातील रिकार्डो कॉक्‍यूएट यांच्या वेदनांवर तब्बल चार दशकांनी भावपूर्ण मार्गाने फुंकर घातली गेली.
 

ब्युनॉस आयर्स - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन म्हणजे आनंदाची पर्वणी. 1978ची स्पर्धा अर्जेंटिनात झाली तेव्हा मात्र हजारो नागरिक फुटबॉलचा आनंद लुटण्याच्या अवस्थेत नव्हते. तेव्हा अर्जेंटिनात हुकूमशाही होती. त्या वेळी अनेकांना राजकीय कैदी म्हणून गजाआड करण्यात आले. यातील रिकार्डो कॉक्‍यूएट यांच्या वेदनांवर तब्बल चार दशकांनी भावपूर्ण मार्गाने फुंकर घातली गेली.

हुकूमशहीच्या काळात 1976 ते 1983 दरम्यान तब्बल तीस हजार लोकांना "सरकारी' पद्धतीने गायब करण्यात आल्याचा अहवाल बेपत्ता व्यक्तींवरील राष्ट्रीय आयोगाने दिला. त्या वेळी रिकार्डो यांच्यासह अनेकांना नौदलाच्या ऍकॅडमीत डांबण्यात आले. या ठिकाणी राजकीय कैद्यांचा छळ केला जायचा. आता हेच ठिकाण संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले आहे. तेथे विश्‍वकरंडक स्पर्धेनिमित्त खास प्रदर्शन भरविण्यात आले. रिकार्डो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्याचा बहुमान देण्यात आला. हा सन्मान लाभल्यामुळे रिकार्डो भावविवश झाले होते. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. 65 वर्षांचे रिकार्डो म्हणाले की, तेव्हा आम्ही तुरुंगात होतो. या इमारतीच्या जवळच फुटबॉलप्रेमी सामने पाहताना जल्लोष करायचे. आम्हाला त्यांचा आवाज ऐकू यायचा. आमचा तेव्हा जिवंत व्यक्तींच्या जगाशी संबंध नव्हता. हे पवित्र ठिकाण आहे.' या प्रदर्शनात कैद्यांच्या वैयक्तिक वस्तू, त्यांनी हाताने तयार केलेले पत्ते, असा ठेवा आहे. 

रिकार्डो यांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. त्यांनी तीन बोटे गमावली आहेत. यातील दोन बोटे छळामुळे कापली गेली. "अर्जेंटिनातील जीवन फुटबॉलभोवती केंद्रित झालेले असते; पण निवडणुकीपेक्षा सामना कोण जिंकते, हे कमी महत्त्वाचे असते. अर्थात, गोल नेहमीच सरस न्याय देतो.' 

अर्जेंटिनाने त्या स्पर्धेत नेदरलॅंड्‌सला हरवून विजेतेपद मिळविले होते; पण त्याआधी पेरूवरील त्यांचा 6-0 असा विजय वादग्रस्त ठरला होता. अर्जेंटिनाने ती लढत "फिक्‍स' केल्याचा पेरूच्या पदाधिकाऱ्यांचा दावा होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The football World Cup tragedy