विश्‍वकरंडकात फ्रान्सचे एक पाऊल पुढे; बेल्जियमचा पराभव 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

संयम आणि आक्रमणाच्या या लढतीत संयमाने बाजी मारली. चेंडूवरील ताबा, अचूक पास, शॉट्‌स अशा साऱ्याच आघाड्यांवर बेल्जियमने वर्चस्व राखले, तरी संयम राखून खेळणाऱ्या फ्रान्सने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत बाजी मारली. पूर्वार्धात एडन हजार्डच्या एक हाती खेळाने बेल्जियमने वर्चस्व राखले होते. मात्र, पूर्वार्धाच्या अखेरीस फ्रान्सने दाखवलेली झलक उत्तरार्धात बेल्जियमसाठी आव्हानात्मक ठरली.

सेंट पीटर्सबर्ग : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यंदा फ्रेंच क्रांतीचे एक पाऊल आणखी पुढे पडले. दर्जाच्या पातळीवर सर्वोत्तम झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत मंगळवारी त्यांनी बेल्जियमचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्याच्या उत्तरार्धात 51व्या मिनिटाला उमटीटी याने कॉर्नर किकवर हेडरने केलेला गोल फ्रान्ससाठी निर्णायक ठरला. 

संयम आणि आक्रमणाच्या या लढतीत संयमाने बाजी मारली. चेंडूवरील ताबा, अचूक पास, शॉट्‌स अशा साऱ्याच आघाड्यांवर बेल्जियमने वर्चस्व राखले, तरी संयम राखून खेळणाऱ्या फ्रान्सने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत बाजी मारली. पूर्वार्धात एडन हजार्डच्या एक हाती खेळाने बेल्जियमने वर्चस्व राखले होते. मात्र, पूर्वार्धाच्या अखेरीस फ्रान्सने दाखवलेली झलक उत्तरार्धात बेल्जियमसाठी आव्हानात्मक ठरली. एम्बाप्पे आणि लुकाकू या मध्यवर्ती आकर्षण राहिलेल्या खेळाडूंमध्ये एम्बाप्पेच्या वेगाला उत्तरार्धात बेल्जियमकडे उत्तर नव्हते. त्यात लुकाकू अखेरपर्यंच चेंडूची वाटच बघत राहिला. हाच या सामन्यातील महत्त्वाचा फरक ठरला. उत्तरार्धात फ्रान्सने आपली चाल बदलली आणि डाव्या बाजूने केलेली त्यांची आक्रमणे बेल्जियमच्या कसोटीची ठरली. ग्रीझमनचा प्रयत्न फोल ठरताना मिळालेल्या कॉर्नरवर त्यांनी संधी साधली. काहीसा दुर्लक्षित राहिलेल्या उमटीटीला बेल्जियमने गृहित न धरण्याची चूक झाली. फेल्लानी त्याला रोखण्यासाठी जरूर पुढे आला, पण तोवर उमटीटीच्या हेडरने जाळीचा वेध घेतला होता. या गोल आघाडीनंतर फ्रान्सने गोलकक्षात दाखवलेला बचाव भेदण्यात बेल्जियमला यश आले नाही. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीला शोभावा, असाच दर्जेदार खेळ दोन्ही संघांकडून बघायला मिळाला. सामन्याची पहिली तीन मिनिटे एम्बाप्पेने बेल्जियमच्या बचावपटूंची कसोटी पाहिली, तर पुढची तीन मिनिटे हजार्डने फ्रान्सच्या बचावफळीला सळो की पळो करून सोडले. त्यानंतर पहिल्या तीस मिनिटांत बेल्जियमकडून धारदार आक्रमणे पाहायला मिळाली. पण, फ्रान्सचा गोलरक्षक लॉरिस भक्कमपणे उभा राहिला. त्याच वेळी पूर्वार्धातील अखेरच्या दहा मिनिटांत फ्रान्सच्या आक्रमणात दिसलेली ताकद उत्तरार्धातील उत्कंठा वाढविणारी ठरली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France beat belgium by 1-0 in Semi Final Football World Cup