संयमाला राहणार आक्रमणाचे आव्हान 

वृत्तसंस्था
Tuesday, 10 July 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील दोन तुल्यबळ संघ फ्रान्स आणि बेल्जियम समोरासमोर येत आहेत. या वर्षी स्पर्धेत टिकून राहिलेला फ्रान्स हा एकमेव माजी विजेता संघ आहे. त्यामुळेच अनुभवाच्या जोरावर त्यांची बाजू भक्कम ठरेल. मात्र, बेल्जियमच्या यंदाच्या झपाट्याला त्यांना विसरून चालणार नाही. 

सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील दोन तुल्यबळ संघ फ्रान्स आणि बेल्जियम समोरासमोर येत आहेत. या वर्षी स्पर्धेत टिकून राहिलेला फ्रान्स हा एकमेव माजी विजेता संघ आहे. त्यामुळेच अनुभवाच्या जोरावर त्यांची बाजू भक्कम ठरेल. मात्र, बेल्जियमच्या यंदाच्या झपाट्याला त्यांना विसरून चालणार नाही. 

आधी पोर्तुगाल, नंतर अर्जेंटिना, मग एकाच दिवशी उरुग्वे आणि ब्राझील असे प्रमुख संघ पराभूत झाल्यानंतर साहजिकच संभाव्य विजेतेपदाया शर्यतीत फ्रान्सला अधिक पसंती मिळत आहे. तुलना करायची झाल्यास यंदा फ्रान्सच्या तुलनेत बेल्जियमचा प्रवास अधिक सुकर ठरला आहे. यापूर्वी 1986च्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविल्यानंतर त्यांनी प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेत मोठी मजल मारली आहे. एकूणच या दोन्ही संघांची शैली बघता संयमाला आक्रमणाचे आव्हान राहणार आहे. 

सरस फ्रान्स 
बेल्जियमची घोडदौड डोळ्यांत भरणारी दिसत असली, तरी फ्रान्सने अनपेक्षित मिळविलेले यश नक्कीच त्यांचा आत्मविश्‍वास उंचावणारे ठरेल यात शंका नाही. अर्जेंटिना आणि उरुग्वे या दोन माजी विजेत्यांविरुद्ध त्यांनी दाखवलेला खेळ हेच दाखवून देतो. अर्जेंटिनाविरुद्धची त्यांची आक्रमकता नजरेत भरली, तर उरुग्वेविरुद्ध त्यांनी दाखवलेला सांघिक खेळ वैशिष्टपूर्ण ठरला. त्यामुळे आता यंदा स्पर्धेत एकूणच नजरेत भरणारा खेळ करणाऱ्या बेल्जियमविरुद्ध त्यांना सातत्य दाखवावे लागले. 

धडाकेबाज बेल्जियम 
यंदाच्या स्पर्धेत बेल्जियम संघाने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. स्पर्धेत सर्वाधिक गोल करून त्यांनी सुरवातीपासून प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. शारीरिक आणि मानसिकतेच्या आघाडीवर परिपूर्ण खेळ करून त्यांनी आपल्या "रेड डेव्हिल्स' विशेषणाला "गोल्डन जनरेशन'ची जोड दिली आहे. स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याची संधी असलेला लुकाकू धोकादायक वाटत असला, तरी त्याच्या गोल करण्यापेक्षा गोल करण्यासाठी तो निर्माण करत असलेल्या संधी अधिक धोकादायक ठरल्या आहेत. त्यामुळे उद्या लुकाकू बेल्जियमचे ट्रम्प कार्ड ठरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: france belgium football match in worldcup 2018