फ्रान्सची बाद फेरीत धडक

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सकडून गोल करणारा सर्वांत लहान खेळाडू ठरलेल्या क्‍येलिंन एमबाप्पेच्या शानदार खेळाने फ्रान्सने पेरूचा 1-0 असा पराभव केला आणि विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी निश्‍चित केली.

एकेटरिंगबर्ग, ता. 21 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सकडून गोल करणारा सर्वांत लहान खेळाडू ठरलेल्या क्‍येलिंन एमबाप्पेच्या शानदार खेळाने फ्रान्सने पेरूचा 1-0 असा पराभव केला आणि विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी निश्‍चित केली. या पराभवामुळे पेरूचे आव्हान संपुष्टात आले. 
मॅंचेस्टर युनायटेडइतकाच फ्रान्सचा संघ आक्रमणात ताकदवर समजला जातो. संभाव्य विजेतेपदाच्याही ते शर्यतीत आहेत. जर्मनी, अर्जेंटिना आणि ब्राझील हे बलाढ्य संघ अडखळत असताना फ्रान्सने मात्र सलग दोन सामने जिंकून यजमान रशियाप्रमाणे लय मिळवली आहे. 
आजच्या सामन्यात पेरूकडून खरं तर चांगली सुरवात झाली होती; परंतु 34 व्या मिनिटाला एमबाप्पेने गोल केला आणि सामन्याचे चित्र बदलत गेले. मात्र पेरूचा खेळ तोडीस तोड होता. चेंडूवरील नियंत्रण आणि पासेसमधील तफावत फार मोठी नव्हती; परंतु पेरूच्या स्ट्रायकरना ऐनवेळी गोलजाळ्याचा वेध घेता येत नव्हता, ही कोंडी फोडण्यासाठी पेरूच्या प्रशिक्षकांनी अखेरच्या क्षणी काही खेळाडूही बदलले; परंतु त्यांचे दैव बदलले नाही. दोन्ही साखळी सामन्यांत अखेर त्यांना एकही गोल करता आला नाही. 
या तुलनेत एमबाप्पेने मिळवून दिलेली आघाडी कायम राखण्यावर फ्रान्सने भर दिला. 

- फ्रान्सचे यापूर्वीचे जगज्जेतेपद 1998 मध्ये. त्यानंतर जन्मलेल्या एमबाप्पे याचा गोल. 
- एमबाप्पे याचे वय 19 वर्षे सहा महिने. विश्‍वकरंडकात गोल करणारा फ्रान्सचा सर्वांत लहान खेळाडू. 
- फ्रान्स विश्‍वकरंडकातील दक्षिण अमेरिकन संघाविरुद्धच्या सलग नऊ लढतींत अपराजित. 
- आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शतक केलेला ह्युगो लिऑन्स हा फ्रान्सचा सातवा खेळाडू. 
- विश्‍वकरंडकात विश्रांतीस आघाडीवर असताना फ्रान्स कधीही पराजित नाही, आता 21 सामन्यांत 20 विजय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France qualified for knockout