फ्रान्समध्ये आनंदोत्सव आणि हुल्लडबाजीही

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

पॅरिस मेट्रोने जगज्जेत्यांचे कौतुक करण्यासाठी काही स्टेशनला खेळाडू तसेच मार्गदर्शकांचे नाव देण्यात आले. नोत्र-देम देस चॅम्प्सचे नामकरण नॉत्रे - दिदिएर देशॅम्प झाले, तर व्हिक्‍टर हुगो स्थानकाचे व्हिक्‍टर हुगो लॉरिस असे झाले.

पॅरिस : फ्रान्स संघ विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीपासून सुरू झालेला जल्लोष अद्यापही थांबण्यास तयार नाही; पण चाहते अतिबेभान झाल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्ष झाला. त्याचबरोबर दोघांना आपल्या जीवास मुकावे लागले.

विश्‍वकरंडक विजेतेपदामुळे फ्रान्समधील अंतर्गत कलह मिटण्यास मदत होईल, असेच चित्र दिसत होते. वीस वर्षापूर्वी फ्रान्सने विजेतेपद जिंकले, त्या वेळी ते कसे नको असलेल्या स्थलांतरित खेळाडूंनी जिंकले यावर भर देण्यात आला होता. आता ही फ्रान्स संघातील निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू स्थलांतरित होते; पण आता परिस्थिती बदलली आहे. याप्रकारचा मतभेद मानण्यास तयार नाही. पॅरिस मेट्रोने जगज्जेत्यांचे कौतुक करण्यासाठी काही स्टेशनला खेळाडू तसेच मार्गदर्शकांचे नाव देण्यात आले. नोत्र-देम देस चॅम्प्सचे नामकरण नॉत्रे - दिदिएर देशॅम्प झाले, तर व्हिक्‍टर हुगो स्थानकाचे व्हिक्‍टर हुगो लॉरिस असे झाले.

पॅरिसमधील जल्लोष रात्रभर थांबला नाही. चॅम्प्स एलीस, दी आर्क डे ट्रिओम्फे, प्लेस डे ला कॉनकोर्ड येथे चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. विजेतेपदानंतर फटाक्‍यांची आतषबाजी सुरू झाली तसेच कारचे हॉर्न वाजवण्यासही. अनेकांनी वाहनांवर चढून आनंद साजरा केला. रविवारी फ्रान्स वर्ल्डकपमयच झाले होते. फॅन्सझोनमध्ये चांगलीच गर्दी असूनही टीव्हीवरून हा सामना दोन कोटी लोकांनी पाहिला.

रात्र चढत गेल्यावर जल्लोषास उधाण आले. कारच्या बोनेटवर, टपावर जात जल्लोष साजरा होऊ लागला. दुचाकींचे झिगझॅग होणे वाढू लागले. त्यातच चॅम्प्स एलीसे येथे पोलिस आणि बेभान चाहत्यातील चकमकी सुरू झाल्या. पोलिसांनी अखेर अश्रुधूर सोडला तसेच पाण्याचे फवारे सोडण्यात आले. बेभान चाहत्यांनी घराच्या तसेच कारच्या काचा फोडल्या. दुकानांचेही नुकसान केले. एकंदर 292 जणांना पोलिसांनी देशभरात ताब्यात घेतले.

हा जल्लोष करताना दोघांचे निधन झाले. पन्नासवर्षीय व्यक्तीने उत्साहाच्या भरात कालव्यात उडी टाकली, पण त्यात फारसे पाणी नसल्याने त्याचे निधन झाले, तर कारच्या टपावर नाचणारा एक युवक झाडाला आदळून ठार झाला. तर एका मोटारबाइक स्वाराने तीन लहान मुलांना जखमी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France vs Croatia World Cup final