बुडणारे जर्मनी तरले नव्वद मिनिटांच्या मेहनतीला भरपाई वेळेत यश

वृत्तसंस्था
Monday, 25 June 2018

सामन्याच्या पहिल्या सेकंदापासून जर्मनीची आक्रमणे सातत्याने गोलपोस्टच्या दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने सुरू होती. चेंडू प्रतिस्पर्धी स्वीडन खेळाडूच्या पायातून जात होता, पाठीला लागत होता, तर कधी गोलपोस्टवर लागत होता; पण अखेर निर्णायक गोल होणार की, तो होणारच नाही, असे वाटत असताना झाला आणि तोही पूर्वार्धात चूक करणाऱ्या क्रूसकडूनच. 

सोची - सामन्याच्या पहिल्या सेकंदापासून जर्मनीची आक्रमणे सातत्याने गोलपोस्टच्या दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने सुरू होती. चेंडू प्रतिस्पर्धी स्वीडन खेळाडूच्या पायातून जात होता, पाठीला लागत होता, तर कधी गोलपोस्टवर लागत होता; पण अखेर निर्णायक गोल होणार की, तो होणारच नाही, असे वाटत असताना झाला आणि तोही पूर्वार्धात चूक करणाऱ्या क्रूसकडूनच. 

टोनी क्रूसने अखेर जर्मनीचे आव्हान कायम ठेवले. गेल्या चार स्पर्धांत गतविजेते तीन वेळा साखळीत बाद झाले होते; पण ही वेळ सध्या तरी जर्मनीवर येणार नाही, याची खबरदारी त्याने घेतली. त्याच्या अचूक फ्री किकने अखेर स्वीडनचा बचाव भेदला गेला. क्रूसला सामन्यातील अखेरच्या मिनिटात लाभलेली फ्री किक घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. बचावपटू मॅट हमेल्स दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. जेरोम बोएतेंग याला रेफरींनी बाहेर काढले होते. थॉमस मुल्लर क्वचितच जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडत होता. मेसूत ओझीलला प्रमुख स्पर्धेतील सलग 26 आंतरराष्ट्रीय लढतीनंतर संघाबाहेर ठेवले होते. त्यामुळे सामन्यातील या अखेरच्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी जर्मनीकडे क्रूसशिवाय पर्याय नव्हता. त्याच्या अचूक किकचा जर्मनीची डोकेदुखी ठरलेल्या स्वीडिश गोलरक्षकास अंदाजच आला नाही. 

जर्मनीची सामन्यावरील हुकमत एकतर्फी होती. प्रतिस्पर्ध्यांना क्वचितच प्रतिआक्रमणाची संधी मिळत होती; पण चेंडूवरील वर्चस्व आणि जास्तीच्या शॉट्‌सपेक्षा गोल महत्त्वाचा असतो, हे स्वीडन दाखवत होते. जर्मनीच्या आक्रमणास रुडच्या दुखापतीने ब्रेक लागल्यानंतर काही वेळातच स्वीडनने गोल केला होता. ओला तॉईवोनेन याने क्रूसच्या चुकीच्या पासचा फायदा घेत रचलेली चाल वेगाने सत्कारणी लावली होती. उत्तरार्धाच्या सुरवातीस मेसुत ओझीलऐवजी खेळवण्यात आलेल्या मार्को रेऊस याने जर्मनीस बरोबरी साधून देत आव्हान राखले होते; पण गतविजेत्याची ताकद दाखवणारा गोल होत नव्हता. तो अखेर क्रूसनेच केला आणि जर्मनीच्या आशांना फुलोरा लाभला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Germany vs Sweden 2018 FIFA World Cup