चित्रपट दिग्दर्शक, दंतवैद्यकासमोर मेस्सी शरण 

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

चित्रपटांचे दिग्दर्शन करताना एखादा कलाकार काय करेल याचा अंदाज त्यांना येत होता. नेमका याच अभ्यासाचा उपयोग करून त्यांनी स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

मॉस्को - चित्रपटांचे दिग्दर्शन करताना एखादा कलाकार काय करेल याचा अंदाज त्यांना येत होता. नेमका याच अभ्यासाचा उपयोग करून त्यांनी स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. अर्थात त्यासाठी साथ लाभली होती दंतवैद्यकाची. आइसलॅंडविरुद्ध अर्जेंटिनास पेनल्टी किक लाभली, त्या वेळी मेस्सी गोल करणार याचीच सर्वांना खात्री होती. त्या वेळी ते त्याच्यासमोर असलेला आइसलॅंडचा गोलरक्षक हेन्स हॉलडोरसन याला गृहितही धरत नव्हते. हॉलडोरसन याने मेस्सीच्या कमकुवत किकचा अचूक अंदाज बांधत आइसलॅंडविरुद्धचा गोल टाळला. 

अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीची तयारी करताना मेस्सी पेनल्टी किक घेऊ शकतो हा विचार केला होता. तो पेनल्टी घेताना काय करतो, त्याची देहबोली कशी असते हे तर पाहिलेच, त्याचवेळी मी पेनल्टी किकला सामोरा जाताना काय करतो, तेही बघितले. त्यामुळे मी जणू त्याच्या मनातच प्रवेश केला. त्यामुळे चेंडू कुठे येणार याचा अंदाज मला नेमका आला, हॉलडोरसन सांगत होता. 

मेस्सीची पेनल्टी रोखणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आल्यासारखेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक गुण मिळवता आला, असेही त्याने सांगितले. आइसलॅंड संघात केवळ हॉलडोरसन हाच फुटबॉलव्यतिरिक्त दुसरी नोकरी करणारा खेळाडू नाही, तर बचावात मोलाची कामगिरी केलेला बिकीर मार सेवर्सन हा मीठ पुड्या तयार करणाऱ्या कंपनीत कामाला आहे. 

मेस्सीभोवती सातत्याने आइसलॅंडचे तीन खेळाडू ठेवून त्याला निष्प्रभ करण्याची योजना आखलेले मार्गदर्शक हैमिर हॉलग्रिसमन हे दंतवैद्यक आहेत. बचावावर समाधानी आहेत, पण चेंडूवर खूपच कमी ताबा राखता आला हे त्यांना सलत आहे. अर्जेंटिनास रोखल्यावर आइसलॅंडने केलेला जल्लोष हा विजेतेपद जिंकल्यासारखाच होता, याकडे लक्ष वेधल्यावर हॉलग्रिसमन म्हणाले, तुम्ही आमचा खरा जल्लोष कुठे पाहिला आहे. 

वर्ल्डकपसाठीच्या जाहिरातीचे दिग्दर्शन 
विश्‍वकरंडकाच्या कालावधीत आइसलॅंडमध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे दिग्दर्शनही हॉलडोरसन याने केले आहे. त्याने युरो स्पर्धेच्या वेळीही काही जाहिराती केल्या होत्या. त्यातील स्कॉलचा जयघोष चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या झोम्बी मूव्हीजही खूपच लोकप्रिय आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goalkeeper who saved Messi's penalty is also a film director