येथून पुढेच मजल मारायची आहे- केन 

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

बेल्जियमविरुद्ध दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केनने यंदाच्या या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आम्हाला अजून चांगली कामगिरी करता आली असती याची कबुली दिली. 

सेंट पीटर्सबर्ग- बेल्जियमविरुद्ध दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केनने यंदाच्या या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आम्हाला अजून चांगली कामगिरी करता आली असती याची कबुली दिली. 

हॅरी केनचे नेतृत्व आणि साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या इंग्लंडच्या नवोदित संघाला संभाव्य विजेत्या संघांमध्ये स्थान दिले जात होते. केनने तर गटसाखळीतच सर्वाधिक सहा गोलही केले होते; परंतु उपउपांत्यपूर्व फेरीनंतर आपल्याला एकही गोल करता आला नाही, याची खंत केनने व्यक्त केली. 

बेल्जियमविरुद्धच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीतील खेळ पाहता अजूनही आम्हाला सुधारणा करण्यासाठी बराच वाव असल्याचे दिसून येते. आमची ईर्षा कमी झालेली नाही, याहूनही अधिक चांगली कामगिरी होऊ शकते, असे आता व्यावसायिक लीगमध्ये टॉटेन्हॅम संघातून खेळणाऱ्या केनने सांगितले. पुढची उपांत्य फेरी खेळण्यासाठी आम्हाला पुढची 28 वर्षे वाट पाहण्याची इच्छा नाही. आता ज्या पातळीवर आहोत तेथून पुढेच मजल मारायची आहे, असाही विश्‍वास केनने व्यक्त केला. 

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याची जिद्द बाळगणाऱ्या इंग्लंडने क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 1-0 आघाडी घेतली होती; परंतु अखेर 1-2 अशा पराभवाचा त्यांना सामना करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hary kane statement about football match