esakal | रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने रेयालची मुसंडी 
sakal

बोलून बातमी शोधा

Ronaldo

दृष्टिक्षेपात 

  • चॅंपियन्स लीगमध्ये गोलांचे शतक नोंदविणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू 
  • याच दरम्यान ऍटलेटिको माद्रिदची क्‍लब म्हणून शतकी गोलांची कामगिरी 
  • रेयाल सलग सातव्या मोसमात उपांत्य फेरीस पात्र, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक प्रदीर्घ मालिका 
  • बायर्न एप्रिल 2014 नंतर स्पर्धेतील बाद फेरीत दोन्ही सामन्यांत प्रथमच पराभूत. यापूर्वी रेयालविरुद्धच उपांत्य फेरीत ही नामुष्की 
  • या स्पर्धेत रोनाल्डोचे बायर्नविरुद्ध नऊ गोल 
  • एका खेळाडूने एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध इतके गोल करण्याची कामगिरी याशिवाय फक्त लिओनेल मेस्सीची (विरुद्ध आर्सेनल) 
  • लेवंडोस्कीचे या स्पर्धेत रेयालविरुद्ध सहा गोल. प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये सर्वाधिक 
  • लेवंडोस्कीचा सहाव्या पेनल्टीवर गोल. शूट-आउटचा अपवाद वगळता या बाबतीत शंभर टक्के यश 
  • आर्तुरो विडालमुळे बायर्नला या स्पर्धेत 19वे रेड कार्ड. युव्हेंट्‌सला सर्वाधिक 22

रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने रेयालची मुसंडी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माद्रिद : 'सुपरस्टार' ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या रेयाल माद्रिदने बायर्न म्युनिकला अतिरिक्त वेळेत हरवून चॅंपियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रोनाल्डोचा एक गोल ऑफसाइड ठरल्याची दाट शक्‍यता होती, तसेच आर्तुरो विडाल याला दुसरे यलो कार्ड मिळणेसुद्धा बायर्नसाठी कठोर ठरले. त्यामुळे या लढतीला वादाचे गालबोट लागले. रोनाल्डोने चॅंपियन्स लीगमध्ये शंभर गोलांचा टप्पा धडाक्‍यात गाठला. 

युरोपमधील या दोन मातब्बर क्‍लबमधील लढत अपेक्षेनुसार चुरशीची झाली. एकूण सहा गोलची नोंद होणे रोमहर्षक ठरले, पण पंचांचे दोन निर्णय वादग्रस्त ठरले. हंगेरीचे पंच व्हिक्‍टर कासाई आणि त्यांच्या सहायकांवर त्यामुळे टीका झाली. 

पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर 1-2 असे पराभूत झाल्यामुळे बायर्नला किमान दोन गोलांच्या फरकाने विजय मिळविणे अटळ होते. त्यांची सुरवात आश्‍वासक झाली. त्यांना दैवाचीही साथ लाभली. केसमीरोने अर्जेन रॉब्बेनला पाडल्यामुळे बायर्नला 53व्या मिनिटाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर रॉबर्ट लेवंडोस्कीने खाते उघडले.

रोनाल्डोने 76व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली होती. केसमीरोने भरपाई करीत त्याला अचूक तिरकस पास दिला. मग रोनाल्डोने अप्रतिम हेडिंग केले. 

त्यानंतर 36 सेकंदांमध्ये सर्जीओ रॅमोस याच्या स्वयंगोलमुळे बायर्नला 2-1 अशी आघाडी मिळाली. चेंडू रॅमोसच्या उजव्या पायाला लागून गिरकी घेत जाळ्यात गेला. यामुळे एकूण सरासरीत (ऍग्रीगेट) 2-2 अशी कोंडी झाली. ती निर्धारित वेळेत कायम राहिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. त्यास सहा मिनिटे बाकी असताना एक महत्त्वाची घटना घडली. बायर्नचा मध्यरक्षक विडाल याला दुसऱ्या पिवळ्या कार्डमुळे मैदान सोडावे लागले. वास्तविक त्याने रेयालचा बदली खेळाडू असेन्सिओ याला रोखताना धसमुसळा खेळ केला नसल्याचे रिप्लेत दिसून आले होते, पण पंचांनी कठोर कारवाई केली. त्याआधी विडालला सहाव्याच मिनिटाला यलो कार्डला सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्याने इस्कोला पाडले होते. 

उत्तरार्धात बायर्नला एका कमी खेळाडूचा फटका बसला. त्यांची काहीशी दमछाक झाली. दुसरीकडे रोनाल्डोने सहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. दुसऱ्या गोलच्यावेळी तो ऑफसाइड असल्याचा बायर्नच्या खेळाडूंचा आक्षेप होता. रॅमॉसच्या पासवर गिरकी घेत त्याने चेंडू जाळ्यात मारला तेव्हा तो किमान एका यार्डाने ऑफसाइड असल्याचे रिप्लेत दिसून आले. रोनाल्डोने त्यानंतर मार्सोलोच्या वेगवान चालीचे गोलमध्ये रूपांतर करीत शतक साजरे केले. मार्को असेन्सीओने संघाचा चौथा गोल केला. 

उपांत्यपूर्व फेरीसाठी जास्त चांगल्या पंचांची नियुक्ती व्हायला हवी. अन्यथा व्हिडिओ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. 'युएफा' त्यासाठीच प्रयत्नशील आहे, कारण पंचांकडून बऱ्याच चुका होत आहेत. 
- कार्लो ऍन्सेलोट्टी, बायर्नचे प्रशिक्षक 

निर्णय बरोबर की चूक या वादात मी पडत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. विडालला दुसऱ्यांदा यलो कार्ड दाखवायला हवे असे काही जण म्हणतील, तर इतरांना तसे वाटणार नाही. ख्रिस्तीयानोचे गोल ऑफसाइड असू शकतील, पण त्यामुळे काही बदलणार नाही. तो आमच्यासाठी नेहमीच निर्णायक खेळ करतो. 
- झिनेदीन झिदान, रेयालचे प्रशिक्षक

loading image