भारत-कंबोडिया आज लढत

पीटीआय
Wednesday, 22 March 2017

नॉम पेव्ह (कंबोडिया) - ‘एएफसी’ आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीची तयारी करणारा भारतीय संघ उद्या मित्रत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीत कंबोडिया संघाशी खेळणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत सायंकाळी ५.३० वाजता होईल.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्युएर्टो रिको विरुद्धच्या लढतीनंतर भारत प्रथमच मित्रत्वाची लढत खेळणार आहे. ‘एएफसी’ आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या लढतीपूर्वी या दोन्ही संघांना मॅच प्रॅक्‍टिसच्या दृष्टिकोनातून ही अखेरची लढत आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्याकडे गांभीर्याने बघत आहेत.

परदेशातील मित्रत्वाच्या लढतीत भारताने २००६ नंतर एकही विजय मिळविलेला नाही. त्या वेळी षण्मुगम वेंकटेशच्या गोलमुळे भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. ‘एएफसी’ पात्रता स्पर्धेत भारताची पहिली लढत यांगॉन येथे म्यानमारशी पडणार आहे.

मित्रत्वाच्या लढतीत भारतीय संघाला दुखापतीने घेरले आहे. अर्णव मोंडल आणि संदेश जिंगन जखमी असल्यामुळे ॲनस इडाथोडिका याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळेल. अर्थात, रॉबिनसिंगच्या परतण्यामुळे भारतीय संघाला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत सुनील छेत्रीच्या बरोबरीने रॉबिनसिंगवर भारताच्या आशा अवलंबून असतील.

भारताने यापूर्वी २००७ मध्ये नवी दिल्लीत कंबोडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वांत मोठा ६-० असा विजय मिळविला होता. त्याची कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघाला त्याहीपेक्षा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन यांनी एएफसी लढतीपूर्वी या सामन्याचा खूप फायदा होईल असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही एएफसी स्पर्धेतील लढत यांगॉन येथे खेळणार आहोत. तेथील आणि येथील वातावरणात खूप साम्य आहे. त्यामुळे आमच्या क्षमतेची इथेच खरी परीक्षा बघितली जाईल. भारतातील फुटबॉलची प्रगती व्हायची असेल, तर अशा मित्रत्वाच्या लढतींमध्ये वाढ व्हायला हवी. त्यादृष्टिने हे पहिले पाऊल पडले असे म्हणायला हरकत नाही.’’

कॉन्स्टटाईन यांनी उद्याच्या सामन्यासाठी अंतिम संघ निवडण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतासाठी खेळणे किती महत्त्वाचे आहे हे सर्व खेळाडू चांगले जाणतात. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या तयारीत आहे. प्रत्येकाला खेळण्याची इच्छा आहे. पण, प्रत्येकाला आपले संघातील स्थान निश्‍चित नाही हेदेखील माहीत आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल हे त्यांना समजले आहे. त्यामुळेच उद्या अंतिम संघ निवडताना माझ्यासमोर मोठे आव्हान आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India-Cambodia fight today