एशियाड नाकारल्याने फुटबॉल संघटनेकडून आयओएचा निषेध

वृत्तसंस्था
Monday, 23 July 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी फुटबॉल संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर टीका केली. आपल्याला कोणत्याही प्रकारे विश्‍वासात न घेता संघाची प्रवेशिका नाकारल्याने फुटबॉल संघटना नाराज आहे. 

मुंबई - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी फुटबॉल संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर टीका केली. आपल्याला कोणत्याही प्रकारे विश्‍वासात न घेता संघाची प्रवेशिका नाकारल्याने फुटबॉल संघटना नाराज आहे. 

भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक झाली. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारतीय ऑलिंपिक संघटनेचा निषेध करण्यात आला, असे महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे. फुटबॉल संघांना पदकाची संधी नसल्यामुळे त्यांना वगळल्याचा भारतीय ऑलिंपिक संघटनेचा दावा आहे. 

दरम्यान, वयचोरी रोखण्यासाठी टीडब्लू3 चाचणी करण्याचे महासंघाने ठरवले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळही हीच चाचणी करीत आहे. ही चाचणी क्‍लब, तसेच राज्य स्पर्धेपूर्वी बंधनकारक असेल. या चाचणीचा खर्च संबंधित क्‍लब अथवा संघटनेने करायचा आहे. वयोगटाच्या स्पर्धेत आता पाच बदली खेळाडूंची निर्धारित वेळेत मुभा असेल. 

सुनील छेत्री सर्वोत्तम 
भारतीय कर्णधार सुनील छेत्रीची गतवर्षातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. छेत्रीने नुकतेच आंतरराष्ट्रीय लढतीचे शतक पूर्ण केले. तसेच, सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत त्याने लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे. अनिरुद्ध थापाची सर्वोत्तम नवोदित खेळाडू म्हणून निवड झाली. मुंबईतील चौरंगी स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी केली होती. इ पांथोई हिची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IOAs protest by the football federation