जपानचे लक्ष्य गटविजेतेपद 

वृत्तसंस्था
Thursday, 28 June 2018

अगोदरच आव्हान संपुष्टात आलेल्या पोलंडविरुद्ध बरोबरीही पुरेशी असलेल्या जपानची विश्‍वकरंडक स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरी जवळपास निश्‍चित आहे; परंतु विजय मिळवून ह गटात अव्वल स्थान मिळविणे हेच त्यांचे लक्ष्य आहे. 
 

व्होल्वोगार्ड (रशिया) - अगोदरच आव्हान संपुष्टात आलेल्या पोलंडविरुद्ध बरोबरीही पुरेशी असलेल्या जपानची विश्‍वकरंडक स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरी जवळपास निश्‍चित आहे; परंतु विजय मिळवून ह गटात अव्वल स्थान मिळविणे हेच त्यांचे लक्ष्य आहे. 

जपानचे दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. विजय किंवा बरोबरी त्यांना पुढच्या फेरीचा मार्ग मोकळा करून देणारी आहे; परंतु जपानी खेळाडू कोणत्याही आकडेवारीचा विचार न करता विजयालाच प्राधान्य देण्याचेच धोरण अवलंबिणार आहे. 

सामन्याच्या निकालापेक्षा आखलेल्या योजना मैदानावर कशा अमलात आणायच्या याची तयारी आम्ही करत आहोत. कोणतीही आकडेवारी करण्यापेक्षा विजयाचे तीन गुण आमच्यासाठी महत्त्वाचे असतील असे जपानचा कर्णधार माकोटो हसेबेने सांगितले. 

रविवारी सेनेगेलविरुद्ध झालेल्या 2-2 बरोबरीनंतर दोन्ही संघांचे समान गुण झाले आहेत. दोघांचीही गोल सरासरीही समान आहे. उद्याच्या सामन्यात पोलंडचा पराभव केला किंवा बरोबरी झाली, तर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात ते दुसऱ्यांदा गटात अपराजित राहून बाद फेरी गाठतील. 2002 मधील संयुक्त यजमानपदाच्या स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. 

जपान आणि सेनेगल यांचे समान गुण झाले, तर पिवळे आणि लाल कार्ड दोघांपैकी कोणाला जास्त मिळाले, यावरून गटातील पहिला-दुसरा क्रमांक निश्‍चित केला जाईल. तेथेही बरोबरीची कोंडी फुटली नाही, तर फिफा ड्रॉ काढून पहिला-दुसरा क्रमांक निश्‍चित करेल. म्हणून अशी आकडेवारी टाळण्यासाठी आमचा प्रयत्न विजय मिळवण्यासाठी असेल, असे जपानी कर्णधार म्हणतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan's goal is to win the football world cup