सनसनाटी विजयानंतरही कोरियाला कानपिचक्‍या

वृत्तसंस्था
Friday, 29 June 2018

जर्मनीविरुद्धचा विजय नक्कीच मोलाचा आहे, तरीही कोरिया फुटबॉलने खूप प्रगती करण्याची गरज आहे. आपण आगामी चारच नव्हे तर पुढील आठ वर्षांचा विचार करायला हवा.  - सॉन हेऊंग मिन, कोरिया मध्यरक्षक 

कझान - दक्षिण कोरिया संघ तसेच चाहते अजूनही जगज्जेत्या जर्मनीवरील विजयात बेभान आहेत, पण त्याचवेळी कोरियातील फुटबॉलतज्ज्ञ संघाच्या मोहिमेत दिसलेल्या मोठ्या उणिवा झाकण्यासाठी या विजयाचा वापर करू नका, असा इशारा देत आहेत. 

जर्मनीला हरविल्यानंतरही आपण साखळीत बाद झालो, असे नाट्यमय चित्र कोरिया संघ करीत आहे, पण भरपाई वेळेतील दोन गोल त्यापूर्वीच्या खराब खेळाचे विस्मरण होऊ देत नाहीत. स्वीडनने सलामीला कोरियाला 1-0 हरवताना क्वचितच कोरियास संधी दिली, तर मेक्‍सिकोविरुद्ध सरस खेळ केल्यानंतरही 1-2 हार पत्करावी लागली. आता आपल्याला बाद फेरीसाठी गोलच हवा असेच जर्मनीने ठरवले, त्या वेळीच कोरियाचा गोल झाला. 

कोरियातील फुटबॉलतज्ज्ञ बाद फेरीची संधी आपली हुकली असे सामन्यानंतर दाखवत असले तरी त्यांना स्वीडनने मेक्‍सिकोविरुद्ध विजय मिळवल्याचे नक्कीच समजले असणार याकडे लक्ष वेधतात. चार वर्षांपूर्वी ब्राझीलला स्पर्धेत एकही लढत जिंकता आली नव्हती, तर या वेळी एक विजय मिळवता आला, पण दोन्ही मोहिमेत फारसा फरक नव्हता, हेच खरे चित्र आहे. 

अभेद्य बचाव, मध्यरक्षक आणि बचावपटूंची प्रतिस्पर्ध्यांना रोखणारी व्यूहरचना आणि वेगवान प्रतिआक्रमण ही कोरिया फुटबॉलची खासियत, पण ती विश्‍वकरंडक स्पर्धेत क्वचितच दिसली. जर्मनीची आक्रमणे कोरियाचा गोलरक्षक प्रामुख्याने रोखत होता. आशियाई व्यावसायिक क्‍लब संघ कोरियन बचावपटूंना पसंती देतात, पण स्वीडनने त्यांच्या मर्यादा दाखवल्या. टॉटनहॅम हॉट्‌सपूरचा सॉन हेऊंग मिन हा माफक संधीचाही फायदा घेतो असे कोरियन सांगत होते, प्रत्यक्षात त्याने गोल केला; त्या वेळी जर्मनीचा गोलरक्षकही मध्यरक्षक झाला होता. 

जर्मनीविरुद्धचा विजय नक्कीच मोलाचा आहे, तरीही कोरिया फुटबॉलने खूप प्रगती करण्याची गरज आहे. आपण आगामी चारच नव्हे तर पुढील आठ वर्षांचा विचार करायला हवा.  - सॉन हेऊंग मिन, कोरिया मध्यरक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Korea won the sensational victory