ब्राझील आऊट; आता लढाई युरोपियन देशांमध्ये (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
शनिवार, 7 जुलै 2018

बेल्जियमचा संघ या विजयामुळे उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत गेला आहे. यापूर्वी 1986 च्या विश्वकरंडकात बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत पोचला होता. त्यावेळी त्यांना अर्जेंटिनाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ब्राझीलला गेल्या चार विश्वकरंडकात युरोपियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. ब्राझीलविरुद्ध गेल्या 30 सामन्यांनंतर दुसरा गोल झाला आहे. 2016 मध्ये पॅराग्वेने त्यांच्याविरुद्ध दोन गोल केले होते. 

बेल्जियमच्या गोल्डन जनरेशनने उपउपांत्य फेरीत ब्राझीलचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्राझील स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता विश्वकरंडकासाठी युरोपियन देशांमध्ये लढाई असणार आहे.  

या सामन्याची सुरवातच विद्युत वेगाने झाली. बेल्जियमने पहिल्या 30 मिनिटांतच दोन गोल करत ब्राझीलला आश्चर्यचकीत केले. बेल्जियमसाठी पहिला गोल त्यांच्यासाठी नशिबवान झाला. 13 व्या मिनिटाला ब्राझीलच्या फर्नांडिनो याने स्वयंगोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 31 व्या मिनिटाला केव्हीन डीब्रॉयन याने डीच्या बाहेरून मारलेल्या शॉटवर गोल करत बेल्जियमला आणखी आघाडीवर नेले. या सामन्याची सुरवात वेगळ्या पद्धतीने झाली असती, कारण ब्राझीलच्या थियागो सिल्वाने मारलेला शॉट गोल पोस्टला लागला. त्यानंतर 11 व्या मिनिटाला ब्राझीलचा पावलिनो हा कॉर्नरवर सोपा गोल करण्यात अपयशी ठरला. पण, असे न झाल्याने बेल्जियमच्या दोन गोलमुळे पाहिल्या हाफमध्ये बेल्जियम आघाडीवर राहिले.

दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने सामन्यात परतण्याचे प्रय़त्न केले. त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. पण, त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. खेळाच्या 76 व्या मिनिटाला बाझीलचा बदली खेळाडू रेनाटो ऑगस्टो याने पुतिनोच्या पासवर हेडरद्वारे गोल करत ब्राझीलसाठी पहिला गोल केला. ब्राझील बरोबरी साधून सामना अतिरक्त वेळेत जाईल, अशी आशा निर्माण झाला. शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये बेल्जियमचा गोलरक्षक कोर्तुवा याने जबरदस्त गोलरक्षण करत ब्राझीलचे सर्व प्रयत्न अपयशी ठरविले आणि बेल्जियमला विजय मिळवून दिला. बेल्जियमच्या गोल्डन जनरेशनकडून जी अपेक्षा होती ती त्यांना त्यांच्या खेळातून दाखवून दिली. प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी केलेले बदल हेच संघासाठी फायद्याचे ठरले. 

बेल्जियमचा संघ या विजयामुळे उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत गेला आहे. यापूर्वी 1986 च्या विश्वकरंडकात बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत पोचला होता. त्यावेळी त्यांना अर्जेंटिनाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ब्राझीलला गेल्या चार विश्वकरंडकात युरोपियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. ब्राझीलविरुद्ध गेल्या 30 सामन्यांनंतर दुसरा गोल झाला आहे. 2016 मध्ये पॅराग्वेने त्यांच्याविरुद्ध दोन गोल केले होते. 

शुक्रवारी उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने उरुग्वेचा 2-0 ने पराभव केला. आता उपांत्य फेरीत बेल्जियमचा सामना फ्रान्सविरुद्ध होणार आहे. ब्राझील स्पर्धेबाहेर गेल्या आता विश्वकरंडक विजेता संघ हा युरोपियन देश असेल हे नक्की असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Brazil vs Belgium match