'स्टार' ब्राझीलचा अपयशी खेळ (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Monday, 18 June 2018

विश्वकरंडकात रविवारचा दिवस तसा धक्कादायक निकाल नोंदविणाराच ठरला. पहिल्या सामन्यात सर्बियाने कोस्टारिकाला 1-0 असे हरविले. त्यानंतर गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने 1-0 असे हरवून खळबळजनक निकाल नोंदविला. तर, तिसऱ्या सामन्यात ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या आणि स्वित्झर्लंड सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे ब्राझीलची ही कामगिरी त्यांच्या खेळास साजेशी अशी नव्हती.

विश्वकरंडकात रविवारी रात्री झालेल्या ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाली. सामना सुरु झाल्यापासून ब्राझीलचे सामन्यावर वर्चस्व होते. तेच 20 व्या मिनिटाला गोलच्या स्वरुपात दिसून आले. ब्राझीलच्या फिलीप कुटिनो याने 25 यार्डावरून मारलेल्या सुरेख किकवरून चेंडू थेट गोलपोस्टमध्ये जाऊन धडकला. या गोलने ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. परंतू स्वित्झर्लंडने पिछाडीवर असूनही दबावात न जाता ब्राझीलला आणखी वर्चस्व मिळविण्याची संधी दिली नाही. त्यांनी ब्राझीलला आणखी गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ब्राझीलला 1-0 अशीच आघाडी मिळविता आली.

दुसऱ्या हाफच्या सुरवातीपासूनच ब्राझीलच्या खेळाडूंनी आपले नियंत्रण ठेवले होते आणि त्यांना आपण विजय मिळवू असे वाटत होते. पण, स्वित्झर्लंडने कॉर्नरवर गोल नोंदविला. व्हेर्डेल शकिरी याने मारलेला कॉर्नरवरील चेंडूला एस. झुबेरने हेडरद्वारे गोलपोस्टकडे दिशा देत गोल नोंदविला व स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. ब्राझीलच्या बचावफळीने झुबेरला व्यवस्थित मार्क न केल्याने त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. हा गोल आहे की नाही यासाठी व्हिएआरचा वापर करण्यात आला. झुबेरने हेडर मारला तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या ब्राझीलच्या मिरँडाला ढकलून त्याने गोल केला असे आक्षेप ब्राझीलकडून नोंदविण्यात आला. पण, व्हीएआरमध्ये त्याने असे केले नसल्याचे स्पष्ट झाले आणि स्वित्झर्लंडचा गोल नोंदविण्यात आला.

ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने चांगला खेळ करूनही ब्राझील संघाला वर्चस्व मिळविता आले नाही. स्वित्झर्लंडच्या हाफमध्ये ब्राझीलच्या नेमार, फिलीप कुटिनो, विलियन या स्टार खेळाडूंना आपली चमक दाखविता आली नाही. त्याचाच परिणाम सामना बरोबरी सुटण्यावर झाला. म्हणून विजय अपेक्षित असलेल्या ब्राझीलला बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने त्यांच्यासाठी ही कामगिरी निराशाजनकच ठरली.

विश्वकरंडकात रविवारचा दिवस तसा धक्कादायक निकाल नोंदविणाराच ठरला. पहिल्या सामन्यात सर्बियाने कोस्टारिकाला 1-0 असे हरविले. त्यानंतर गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने 1-0 असे हरवून खळबळजनक निकाल नोंदविला. तर, तिसऱ्या सामन्यात ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या आणि स्वित्झर्लंड सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे ब्राझीलची ही कामगिरी त्यांच्या खेळास साजेशी अशी नव्हती.

ब्राझीलला गेल्या नऊ विश्वकरंडक स्पर्धांनंतर पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी 1978 च्या विश्वकरंडकात ब्राझीलने आपला पहिला सामना स्वीडनबरोबर बरोबरीत सोडविला होता. त्यानंतर ते सलग विश्वकरंडकात आपला पहिला सामना जिंकले होते. पण आता नऊ विश्वकरंडकानंतर ब्राझील आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरले आहे. तसेच स्वित्झर्लंडनेही गेल्या पाच विश्वकरंडकात पहिला सामना कधीच गमाविलेला नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सलामीच्या सामन्यांतील दोन सामन्यांत विजय आणि तीन सामने बरोबरीत सोडविले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Brazil vs Switzerland match