कोलंबियाचा विजय अन् पोलंड स्पर्धेबाहेर (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
सोमवार, 25 जून 2018

ह गटात रविवारी जपान आणि सेनेगल यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या गटात जपान 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सेनेगलही 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलंबिया तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पोलंडने दोन्ही सामने गमविल्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. कोलंबियाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सेनेगलचा पराभव करणे आवश्यक आहे. 

कोलंबियाने जोरदार खेळ करत पोलंडचा 3-0 ने पराभव केला. या पराभवामुळे पोलंड हा विश्वकरंडकाबाहेर जाणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे. 

कोलंबियाने या सामन्याची सुरवात चांगली केली. गेल्या विश्वकरंडकातील गोल्डन बॉलचा विजेता हामेज रॉड्रीगेज या सामन्यात सुरवातीपासूनच उतरला. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून तो मैदानात उतरला होता. पोलंडविरुद्धच्या सामन्यात रॉड्रीगेजमुळे कोलंबियाचा संघ दमदार खेळ करू शकला. रॉड्रीगेजच्या मैदानावरील वावरामुळे कोलंबियाच्या खेळाडूंना लय सापडली होती. याचाच परिणाम 40 व्या मिनिटाला दिसला, कॉर्नरवरून रॉ़ड्रीगेजने दिलेल्या पासवर कोलंबियाच्या येरी मीना याने जोरदार हेडर मारत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुले पहिला हाफमध्ये कोलंबियाचे वर्चस्व राहिले.

दुसऱ्या हाफमध्ये पोलंडचा प्रमुख खेळाडू रॉबर्ट लेवांडॉस्की याने गोल करण्याचे प्रयत्न केले. पण, त्याला अपयश आले. त्याने पोलंडला बरोबरीत आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. 70 व्या मिनिटाला कोलंबियाच्या क्विंटेरोने दिलेल्या अचूक पासवर कोलंबियाचा कर्णधार रेडेमल पाल्काव याने गोल करत कोलंबियाची आघाडी वाढविली. त्यानंतर पाचव्याच मिनिटाला 75 व्या मिनिटाला रॉ़ड्रीगेजच्या पासवर वान क्वाद्रादो याने गोल करून कोलंबियाला निर्णायक विजय मिळवून दिला. 

ह गटात रविवारी जपान आणि सेनेगल यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या गटात जपान 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सेनेगलही 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलंबिया तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पोलंडने दोन्ही सामने गमविल्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. कोलंबियाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सेनेगलचा पराभव करणे आवश्यक आहे. 

गेल्या दोन म्हणजे 2014 आणि 2018 च्या विश्वकरंडकात कोलंबियाच्या रॉड्रीगेजचा दहा गोलमध्ये सहभाग होता. त्याने स्वतः 6 गोल केले असून, 4 गोलमध्ये त्याचा सहभाग होता. दोन विश्वकरंडकांमध्ये दहा गोलमध्ये सहभाग असणारा रॉ़ड्रीगेज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. विश्वकरंडकात रविवारी झालेल्या तीन सामन्यांमध्ये एकूण 14 गोल करण्यात आले. यापूर्वी एकाच दिवशी तीन सामन्यांत 14 गोल मारण्याची कामगिरी 10 जून 1990 मध्ये झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Colombia vs Poland match