मॅंड्झुकीचच्या गोलने क्रोएशिया प्रथमच फायनलमध्ये (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Thursday, 12 July 2018

इंग्लंडने या सामन्याची सुरवात आक्रमकपणे करत पाचव्या मिनिटालाच गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडच्या ट्रिप्पियरने फ्रिकीकवर गोल मारत इंग्लंडसाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडचे सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व होते. त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या, पण त्यांनी त्या दवडल्या. क्रोएशियाच्या टीमनेही दबावात खेळ करताना इंग्लंडला आणखी गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये इंग्लंड 1-0 आघाडीवर राहिले.

मारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे.

इंग्लंडने या सामन्याची सुरवात आक्रमकपणे करत पाचव्या मिनिटालाच गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडच्या ट्रिप्पियरने फ्रिकीकवर गोल मारत इंग्लंडसाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडचे सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व होते. त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या, पण त्यांनी त्या दवडल्या. क्रोएशियाच्या टीमनेही दबावात खेळ करताना इंग्लंडला आणखी गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये इंग्लंड 1-0 आघाडीवर राहिले.

दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियाने पहिल्या मिनिटापासून इंग्लंडवर दबाव टाकण्यास सुरवात केली. याचा फायदा त्यांना 68 व्या मिनिटाला झाला. इव्हान पेरिसीच याने गोल करून क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. हा गोल झाल्यानंतर इंग्लंडचा युवा संघ दबावाखाली गेल्याचे दिसून आले. याचाच फायदा उठविण्याचा क्रोएशियाच्या खेळाडूंनी घेतला. पेरिसीच आणि मँड्झुकीच यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. पेरिसीचचा शॉट गोलपोस्टला लागला, तर मॅड्झुकीच शॉट इंग्लंडचा गोलरक्षकाने अडविला. त्यामुळे सामना निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला आणि सामना अतिरिक्त वेळेत गेला.

अतिरिक्त वेळेत पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सावध खेळ करत एकमेकांना संधी दिली नाही. मात्र, अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये 109 व्या मिनिटाला मँड्झुकीचने उत्कृष्ट निर्णायक गोल करत क्रोएशियाला इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोचविले. 

क्रोएशियाने या विश्वकरंडकात त्यांच्या गटातील अर्जेंटिना, नायजेरिया आणि आइसलँड यांचा पराभव करत गटात अव्वल स्थान राखले होते. त्यानंतर डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या सामन्यात पिछाडीवर असूनही त्यांचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. विश्वकरंडकाच्या दावेदारांमध्ये नाव नसतानाही क्रोएशियाने अनपेक्षित कामगिरी करत विश्वकरंडक स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. यापूर्वी 1998 च्या विश्वकरंडकात क्रोएशियाचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोचला होता. त्यावेळी त्यांचा पराभव फ्रान्सकडून झाला होता. आता त्यानंतर क्रोएशिया अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्धच खेळणार असल्याने त्यांना या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. शनिवारी तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंडचा सामना बेल्जियमशी होणार आहे. तर, रविवारी अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Croatia vs England match