इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर ऐतिहासिक विजय (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
बुधवार, 4 जुलै 2018

इंग्लंडने आतापर्यंत विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. तसेच 1998 नंतर प्रथमच इंग्लंडच्या गोलकिपरला पेनल्टी शूटआऊटमध्ये पेनल्टी अडविण्यात यश आले आहे. 1998 मध्ये अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड सिमेनने पेनल्टी अ़डविली होती. या ऐतिहासिक पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविल्यानंतर इंग्लंडचा सामना उपउपांत्य फेरीत स्वीडन बरोबर होणार आहे. इंग्लंडकडे विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. कायम कमनशिबी ठरलेल्या आणि विजेतेपदासाठी चर्चत असलेल्या इंग्लंडला यंदा तरी विजय मिळविण्यात यश मिळतेय का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे.

या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दोन्ही संघातील आघाडीच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आल्याने पहिल्या हाफमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली. दुसऱ्या हाफच्या सुरवातीलाच इंग्लंडला पेनल्टी मिळाली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने या पेनल्टीवर गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यंदाच्या विश्वकरंडकातील हॅरी केनचा हा सहावा गोल होता. केन हा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. इंग्लंड हा सामना जिंकेल असे वाटत असतानाच कोलंबियाच्या मिना याने भरपाई वेळेत 90 (+3) मिनिटाला कॉर्नरवर हेडरद्वारे गोल करत कोलंबियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी जास्त जोखीम न घेता आपला बचावात्मक खेळ कायम ठेवला. त्यामुळे अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागणार हे स्पष्ट झाले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडच्या हेंडरसन याची पेनल्टी कोलंबियाचा गोलकिपर डेव्हिड ऑस्पीना याने अडविली. यामुळे इ्ंग्लंडचा पराभव होईल असे वाटले. कोलंबिया यावेळी 3-2 ने आघाडीवर असताना कोलंबियासाठी चौथी पेनल्टी मारणारा उरीबे याने पेनल्टी पोलवर मारली व तो गोल करण्यात अपयशी ठरला, त्यानंतर पाचव्या पेनल्टीवरही कोलंबियाचा बाका याला गोल करता आला नाही. इंग्लंडचा गोलकिपर जॉर्डन पिकफोर्ड याने उत्कृष्टरित्या ती अडविली. अखेर इंग्लंडसाठी डायरने पेनल्टीवर चौथा गोल करत संघाला 4-3 असा विजय मिळवून दिला. 

इंग्लंडने आतापर्यंत विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. तसेच 1998 नंतर प्रथमच इंग्लंडच्या गोलकिपरला पेनल्टी शूटआऊटमध्ये पेनल्टी अडविण्यात यश आले आहे. 1998 मध्ये अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड सिमेनने पेनल्टी अ़डविली होती. या ऐतिहासिक पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविल्यानंतर इंग्लंडचा सामना उपउपांत्य फेरीत स्वीडन बरोबर होणार आहे. इंग्लंडकडे विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. कायम कमनशिबी ठरलेल्या आणि विजेतेपदासाठी चर्चत असलेल्या इंग्लंडला यंदा तरी विजय मिळविण्यात यश मिळतेय का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup England vs Colombia match