क्रुसच्या गोलने गतविजेत्या जर्मनीचे आव्हान कायम (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Sunday, 24 June 2018

या विजयामुळे जर्मनी एफ ग्रुपमध्ये तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी याच गटातील झालेल्या सामन्यात मेक्सिकोने कोरियाचा 2-1 असा पराभव करून सहा गुणांसह गटात आघाडी मिळविलेली आहे. स्वीडन तिसऱ्या क्रमांकावर तीन गुणांसह आहे. तर, कोरियाचा संघ पात्रता फेरीतच विश्वकरंडकातून बाहेर पडला आहे. अखेरच्या साखळी सामन्यांत जर्मनीला कोरियाचा पराभव करणे आवश्यक आहे. 

टोनी क्रुसने भरपाई वेळेत मारलेल्या गोलमुळे जर्मनीला यंदाच्या विश्वकरंडकात जिवदान मिळाले. जर्मनीने स्वीडनचा 2-1 असा पराभव करत आपले आव्हान कायम ठेवले. हा विजय मिळाला नसता तर गतविजेच्या जर्मनी पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर जावे लागले असते.

स्वीडनविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळविणे गरजेचे असल्याने जर्मनीने सुरवातीपासूनच जोरदार खेळ करण्यास सुरवात केली. जर्मनीने पहिल्या हाफमध्ये 73 टक्के चेंडू आपल्याकडे ठेवला असला तरी स्वीडनने काऊंटर अॅटॅकवर जोर दिला. याचाच फायदा स्वीडनला झाला, 32 व्या मिनिटाला टोईवोनन याने व्हिक्टर क्लेसेनच्या पासवर जर्मनीचा गोलकिपर मॅन्युएल नॉयलच्या डोक्यावरून गोलपोस्टमध्ये चेंडू पाठविला. याच्याच आगोदर 30 व्या मिनिटाला काउंटर अॅटॅकमध्ये स्वीडन मार्कस बर्ग चेंडू घेऊन जर्मनीच्या डीमध्ये गेला, त्याला जर्मनीच्या खेळाडूने पाडले पण रेफ्रींनी त्यांना पेनल्टी देण्यास नकार दिला आणि व्हिएआरचा वापरही केला नाही. त्यामुळे स्वीडन याठिकाणी दुर्दैवी ठरले. स्वीडनला पहिल्या हाफमध्ये 1-0 अशीच आघाडी मिळविता आली.

दुसऱ्या हाफमध्ये पिछाडीवर असताना आणि स्पर्धेबाहेर पडण्याचे दडपण असूनही जर्मनीच्या खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये याचा परिणाम जाणवू दिला नाही. जर्मनीच्या खेळाडूंनी दुसऱ्या हाफची सुरवात आक्रमक केली. 48 व्या मिनिटाला रुईस याने टिमो व्हेर्नरच्या पासवर गोल करून जर्मनीला बरोबरीत आणले. जर्मनीच्या बचाव फळीत खेळणारा जेरॉन ओएटांग याला 82 व्या मिनिटाला रेफ्रींनी लाल कार्ड दाखवत मैदानाबाहेर पाठविले. त्यामुळे अखेरची आठ मिनिटे जर्मनीला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. एवढ्या अडचणी असूनही भरपाई वेळेतील शेवटच्या मिनिटाला 90 (+5) जर्मनीला पेनल्टी बॉक्सच्या डाव्या साईडने एक फ्रिकीक मिळाली. टोनी क्रुसने या फ्रिकीकवर जबरदस्त गोल करत जर्मनीला विजय मिळवून दिला. या सामन्यात टोनी क्रुसने 144 वेळा चेंडूला पाय लावला, जर्मनीसाठी हा विश्वकरंडकातील विक्रम आहे. निर्णायक गोल करणाऱ्या क्रुसला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

या विजयामुळे जर्मनी एफ ग्रुपमध्ये तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी याच गटातील झालेल्या सामन्यात मेक्सिकोने कोरियाचा 2-1 असा पराभव करून सहा गुणांसह गटात आघाडी मिळविलेली आहे. स्वीडन तिसऱ्या क्रमांकावर तीन गुणांसह आहे. तर, कोरियाचा संघ पात्रता फेरीतच विश्वकरंडकातून बाहेर पडला आहे. अखेरच्या साखळी सामन्यांत जर्मनीला कोरियाचा पराभव करणे आवश्यक आहे. 

विश्वकरंडकात जर्मनीच्या संघाने पिछाडीवर असूनही विजय मिळविण्याची कामगिरी यापूर्वी 1974 मध्ये केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशी कामगिरी त्यांना करता आली आहे. 1974 मध्येही स्वीडनविरुद्धच पहिल्या हाफमध्ये ते 1-0 ने पिछाडीवर होते. पण, अखेर त्यांना 4-2 असा विजय मिळविता आला होता. विश्वकरंडकात जर्मनीने सलग नऊ वेळा एका सामन्यात पराभव झाल्यानंतर पुढील सामन्यात विजय मिळविण्यात यश मिळविलेले आहे. जर्मनीच्या खेळाडूला यापूर्वी 2010 मध्ये रेड कार्ड दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता या विश्वकरंडकात त्यांच्या खेळाडूला रेड कार्ड दाखविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Germany vs Sweden match