esakal | गोलचा वर्षाव करत रशिया बाद फेरीत (मंदार ताम्हाणे)
sakal

बोलून बातमी शोधा

Russia

रशियाच्या संघात जगातील प्रमुख खेळाडूंमध्ये नाव घेतले जाते असा एकही खेळाडू नाही. पण, याच खेळाडूंनी गेल्या दोन सामन्यांत 8 गोल करत फुटबॉल प्रेमींना जणू गोल पाहण्याची पर्वणीच दिली आहे. आक्रमक खेळावर जोर देत रशियाच्या खेळाडूंनी यजमानपद योग्यरित्या संभाळण्यासोबतच चाहत्यांमध्ये फुटबॉलचीही क्रेझ कायम ठेवली आहे.

गोलचा वर्षाव करत रशिया बाद फेरीत (मंदार ताम्हाणे)

sakal_logo
By
मंदार ताम्हाणे

विश्वकरंडक स्पर्धेचे यजमान रशियाने इजिप्तचा 3-1 असा पराभव करून जवळपास बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिला हाफमध्ये गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सामन्याचा निकाल लागला. सामन्यातील चारही गोल दुसऱ्या हाफमध्ये झाले.

या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केल्याने दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये 47 व्या मिनिटालाच रशिया नशीबवान ठरले. रशियाच्या रोमन झोबनीन याने मारलेल्या किकवर चेंडू इजिप्तच्या गोलकिपरने अडवून पुढे ढकलला आणि तो इजिप्तचा कर्णधार अहमद फॅटीच्या पायात आल्याने त्याने चेंडू मैदानाबाहेर मारण्याऐवजी त्याचा अंदाज चुकला अन् त्याने गोलपोस्टमध्येच चेंडू ढकलून स्वयंगोल केला. त्यामुळे रशियाला आघाडी घेता आली. या विश्वकरंडकातील हा पाचवा स्वयंगोल आहे. यानंतर रशियाने नंतरचे दोन गोल चार मिनिटांच्या फरकातच मारले. 59 व्या मिनिटाला रशियाने दुसरा आणि 65 व्या मिनिटाला तिसरा गोल केला. रशियाच्या मारिओ फर्नांडिसने दिलेल्या पासवर डेनिश चेरशेव याने दुसरा गोल केला. चेरशेवने पहिल्या सामन्यातही दोन गोल केले होते. त्यानंतर 65 व्या मिनिटाला रशियाच्या आघाडीच्या फळीतील खेळाडू आर्टेम झ्युबाला डी मध्ये चेंडू मिळाला आणि त्याचे रुपांतर त्याने गोलमध्ये केले. त्याने ऱशियाला निर्णायक अशी 3-0 आघाडी मिळवून दिली. 

इजिप्तचा प्रमुख खेळाडू महंमद सालाह दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. पण, तो या सामन्यात खेळला. सालाहला रशियाच्या खेळाडूने डीच्या रेषेजवळ पाडले. रेफ्रींनी सुरवातीला इजिप्तला फ्रिकीक दिली. मात्र, व्हीएआरचा वापर केल्यानंतर इजिप्तला पेनल्टी देण्यात आली. या पेनल्टीचे 73 व्या मिनिटाला सालाहने गोलमध्ये रुपांतर करून पराभवाचे अंतर कमी केले. 

रशियाच्या संघात जगातील प्रमुख खेळाडूंमध्ये नाव घेतले जाते असा एकही खेळाडू नाही. पण, याच खेळाडूंनी गेल्या दोन सामन्यांत 8 गोल करत फुटबॉल प्रेमींना जणू गोल पाहण्याची पर्वणीच दिली आहे. आक्रमक खेळावर जोर देत रशियाच्या खेळाडूंनी यजमानपद योग्यरित्या संभाळण्यासोबतच चाहत्यांमध्ये फुटबॉलचीही क्रेझ कायम ठेवली आहे. यजमान देशाने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात सर्वांधिक गोल करण्याची बरोबरी यंदा रशियाने केली आहे. त्यांनी दोन सामन्यांतच आठ गोल केले आहेत. यापूर्वी 1934 मध्ये इटलीने पूर्ण विश्वकरंडकात आठ गोल केले होते. रशिया तिसऱ्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. यापूर्वी 2002 आणि 2014 मध्ये झालेल्या विश्वकरंडकातील सामन्यात रशियाने 6 गोल केले होते. पण, आता दोन सामन्यांतच आठ गोल करण्याची कामगिरी करत त्यांनी चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.