कम ऑन अर्जेंटिना! सज्ज होऊन भरारी घ्या!! 

Maradona Column about football match
Maradona Column about football match

अवघा एक सामना बाकी असताना अर्जेंटिनाचा संघ तळाला पाहणे व्यथित करणारे आहे. संघासमोरील आव्हान खडतर आहे, कारण विजय अनिवार्य आहेच, शिवाय क्रोएशिया- आइसलॅंड लढतीच्या निकालावरही भवितव्य अवलंबून आहे. मी मात्र ठाम विश्‍वास ठेवणारा आहे. "ला अल्बीसेलेस्टी'च्या क्षमतेविषयी आशा सोडून देण्यास माझी तयारी नाही. 

इतिहासाशी साम्य 
सध्याची स्थिती पाहून मला 1982 आणि 1990 ची आठवण येते. आम्ही दोन्ही वेळा गतविजेते होतो आणि दोन्ही वेळा आमची सुरवात पराभवाने झाली. 82 मध्ये आम्ही पुढील दोन्ही सामने जिंकले. त्यानंतर आम्ही पुढील फेरीत हरलो. दुसऱ्या वेळी म्हणजे 90 मध्ये मी कर्णधार होतो. आम्ही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. दोन्ही वेळच्या अंतिम कामगिरीतील फरक सोडल्यास मला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो. दोन्ही वेळा कोंडी होऊनही आम्ही झुंज दिली आणि गटातून आगेकूच केली, त्यामुळेच हे शक्‍य असल्याचा विश्‍वास मला मिळतो. 

खेळाडूंना अखेरची संधी 

नायजेरियाविरुद्ध अर्जेंटिनाला मोठा विजय मिळवावा लागेल, त्यासाठी पारडे पूर्णपणे फिरवावे लागेल. साऱ्या जगाला आपली क्षमता आणि पात्रता दाखवून देण्याची ही अखेरची संधी असल्याची जाणीव खेळाडूंना असली पाहिजे. खेळाडू हे करून दाखवतील असा विश्‍वास मला वाटतो. 

साम्पोली यांच्यावर मदार 
प्रशिक्षक जोर्गे साम्पोली यांना परिस्थितीनुरूप डावपेच आखावे लागतील. प्रत्येक खेळाडूवर विशिष्ट जबाबदारी सोपवावी लागेल. त्यांची संघनिवड अचूक असायला हवी. लिओ मेस्सी याने केवळ त्यालाच शक्‍य होईल अशी कामगिरी करून दाखवावी अशी अपेक्षा असेल. असे असले तरी एका खेळाडूवरच अवलंबून राहण्याऐवजी अर्जेंटिनाला आगेकूच करण्यासाठी सांघिक खेळ करून दाखवावा लागेल. 

रॉमेरोची उणीव जाणवली 
आम्ही पहिल्या सामन्यात वर्चस्व राखले; पण आइसलॅंडचा बचाव भेदू शकलो नाही. दुसऱ्या सामन्यात आमचा गोलरक्षक विली कॅबाल्लेरोने गोल भेट दिल्यानंतर क्रोएशियाने वर्चस्व राखले. आम्हाला जायबंदी सर्जिओ रॉमेरो याची उणीव नक्कीच जाणवली; पण फुटबॉलमध्ये काहीही घडू शकते. हरण्यासाठी कुणीही खेळत नाही आणि हा एक "अपघात' होता. आता भूतकाळाकडे पाहण्याऐवजी आम्हाला आहे त्या संधीचा फायदा उठविण्यावर लक्ष केंद्रित करावेच लागेल. 

नायजेरिया धोकादायक 

नायजेरिया धोकादायक प्रतिस्पर्धी आहे. आम्ही विश्‍वकरंडकात त्यांच्याविरुद्ध अनेक वेळा खेळलो आहोत. 2014 च्या स्पर्धेसह दर वेळी आम्ही जिंकलो आहोत. मनोधैर्याच्या पातळीवर ही कामगिरी आमच्या जमेची आहे. नायजेरियाकडे तीन गुण आहेत, त्यामुळे बरोबरी झाली आणि आइसलॅंड संघ क्रोएशियाला हरवू शकला नाही तरी नायजेरिया आगेकूच करू शकेल. नायजेरियाचा संघ झपाटलेला असेल. आमच्या खेळाडूंना भक्कम इच्छाशक्ती प्रदर्शित करावी लागेल आणि आयुष्य पणास लागलेली लढत खेळावी लागेल. 

संघाचे स्वरूप चिंतनीय 
काही मुद्दे भाष्य करण्यासारखे आहेत. अर्जेंटिनाने पहिल्या सामन्यात 4-2-3-1, तर दुसऱ्या सामन्यात 3-4-3 असे स्वरूप ठेवले. दोन्ही वेळा बचाव फळीसमोर मध्य फळी प्रतिकार करू शकली नाही. चार वर्षांपूर्वी जेव्हीयर मॅशेरानो या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करायचा; पण आता त्याला ताण पेलणे शक्‍य होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बचाव फळीवरील दडपण वाढले आहे. अशावेळी काय करायचे हे साम्पोली यांना पाहावे लागेल. 

"गॅप' ठेवून चालणार नाही 
आफ्रिकी संघ वेगवान आणि ताकदवान खेळ करतो. ओघवत्या शैलीचा खेळ करण्याइतपत मोकळीक त्यांना मिळणार नाही, यासाठी अर्जेंटिनाला दक्ष राहावेच लागेल. चाली रचण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मध्य क्षेत्रात बरीच कठोर कामगिरी करून दाखवावी लागेल. "गॅप' कमी करण्यासाठी आमच्या खेळाडूंना एकमेकांच्या जवळ राहावे लागेल. नायजेरियावर दडपण आणण्यासाठी आम्हाला गोल लवकर करणे महत्त्वाचे आहे. 

मेस्सीवर मदार 
सारे जग मेस्सीकडे आशेने बघत आहे. त्याच्यासारखा दर्जेदार खेळाडू सदैव प्रकाशझोतात असणे स्वाभाविकच आहे. पण मी पुन्हा सांगू इच्छितो, की हे काही एकट्या खेळाडूचे काम नाही. फुटबॉलमध्ये तुम्ही जिंकता तसेच हरतासुद्धा ते संघ म्हणूनच... सर्व खेळाडूंना जबाबदारी उचलावी लागेल आणि एकमेकांच्या पाठिंब्याने खेळावे लागेल. विजय मिळविण्याची तळमळ असेल तर तुम्ही जिंकू शकता. कम ऑन अर्जेंटिना! सज्ज होऊन भरारी घेत आव्हानाला सामोरे जा!! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com