फ्रान्सचे पोग्बा, कॅंटे देणार नाहीत बेल्जियमला मोकळीक

Maradona Column about football match
Maradona Column about football match

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील संघांना हरविलेले दोन संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले आहेत. फ्रान्सला 2016च्या युरो स्पर्धेत घरच्या मैदानावर अपयश आले. या कटू आठवणी पुसून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. फ्रान्सकडे योग्य संतुलन साधलेला संघ आहे. त्यांच्या तुलनेत दृष्टिकोन वेगळा असला तरी बेल्जियमचा संघ तितकाच ताकदवान आहे. उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य संघांना हरविल्यामुळे दोन्ही संघांचे मनोधैर्य उंचावले आहे. सुरवातीलाच गोल झाला नाही, तर किमान पहिल्या सत्रात धडाकेबाज खेळाऐवजी डावपेचात्मक झुंज होण्याची मला अपेक्षा आहे. 

बेल्जियमकडे टक्कर देण्याची क्षमता 
बेल्जियम 1986 मध्ये उपांत्य, तर 2014 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाकडून हरले. यावेळचा त्यांचा संघ निर्भय आहे. ड्रॉ खडतर मिळणार असला तरी गटातील अव्वल क्रमांक त्यांनी सोडला नाही आणि त्यावरून हेच दिसून येते. त्यांना ड्रॉविषयी कल्पना होती, पण बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. बेल्जियमला स्वयंगोलसह ब्राझीलने लवकर आघाडी घेण्याची भेट दिली, पण याचा बेल्जियमने फायदा उठविला. त्यांनी आघाडी राखण्यासाठी केलेला खेळ अप्रतिम होता. 

लुकाकू बेल्जियमचा आधारस्तंभ 
फ्रान्सचा संघ दडपण आणणारा खेळ करतो. वेगासाठी किलीयन एम्बापे, तर भेदक चालींसाठी अँटोईन ग्रीझमनवर त्यांची मदार आहे. या तुलनेत बेल्जियमचा संघ प्रत्युत्तर देणारा खेळ करतो. ते परिस्थितीनुसार खेळतात. जपानविरुद्ध दोन गोलांच्या पिछाडीवरून त्यांनी 30 मिनिटांत तीन गोल केले. मग ब्राझीलविरुद्ध त्यांना गरजेच्या वेळी संख्यात्मक निकषावर सरस बचाव केला. रोमेलू लुकाकू हा बेल्जियमचा भक्कम आधारस्तंभ आहे. त्याला एडन हॅजार्ड आणि केव्हिन डी ब्रुईन यांची दर्जेदार साथ मिळते. वेगवान पासेस देत नेटसमोर जाऊन धडकण्याची आणि पेनल्टी क्षेत्रात खेळाडूंची ताकद वाढविण्याची त्यांची शैली पाहताना मजा येते. 

दोन्ही संघांची मध्य फळी भक्कम 
फ्रान्सविरुद्ध वेगळीच कसोटी असेल. ब्राझीलविरुद्ध बेल्जियमसाठी केसमिरोची उणीव फायदेशीर ठरली. त्यामुळे त्यांना मोकळीक मिळू शकली. फ्रान्सविरुद्ध मात्र पॉल पोग्बा आणि एन्गोलो कॅंटे असे करू देणार नाहीत. ताकद आणि चपळाईमुळे या दोघांचा प्रतिस्पर्धी संघांना हेवा वाटतो. ते प्रतिस्पर्ध्यांना चाली रचण्यापासून रोखण्यात तरबेज आहेत. त्याचवेळी ते आक्रमणही करू शकतात. या दोन्ही संघांची मध्य फळी भक्कम आहे आणि त्यामुळेच त्यांना इतकी मजल मारता आली आहे. 

बेल्जियमचा हा संघ वेगळा 
ब्राझीलविरुद्ध संघाचे नवे स्वरूप साधत बेल्जियमने कशी बाजी मारली याची बरीच चर्चा सुरू असल्याची मला कल्पना आहे. स्पर्धेच्या या टप्प्यास असे करण्यासाठी फार धैर्य लागते, पण माझ्यादृष्टिने याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल्जियमने या डावपेचांची मैदानावर यशस्वी अंमलबजावणी केली. डावपेच, पद्धत या गोष्टी चांगल्याच असतात. असे सामने जिंकण्यासाठी धैर्य, जिद्द आणि इच्छाशक्ती लागते. अनेक वर्षे प्रमुख स्पर्धांत चांगला खेळ केलेला, पण हरलेल्या बेल्जियमच्या यावेळच्या संघात हे गुण दिसत आहेत. वेगवान पासिंग आणि कलात्मक खेळामुळे बेल्जियम भक्कम दावेदार बनला आहे. 

इच्छाशक्ती ठरेल निर्णायक 
फ्रान्सचा संघसुद्धा सर्व क्षेत्रांसह फार प्रेरित झाला आहे. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरेल. आक्रमण, बचाव आणि मध्य अशा तिन्ही क्षेत्रांत जवळपास सारखीच क्षमता असलेल्या या संघांचे गोलरक्षकही भरवशाचे आहेत. एकाला पसंती देणे कठीण आहे. दोन संघांमधील फरक फार कमी असताना जिंकण्याची इच्छाशक्ती निर्णायक ठरते. गोल करण्याच्या पराक्रमाची तसेच दडपणाला सामोरे जाण्याची क्षमता दोन्ही संघांकडे आहे. त्यामुळे ही लढत स्पर्धेत सर्वोत्तम ठरू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com