esakal | अर्जेंटिनाला मोफत प्रशिक्षण देण्याची मॅराडोनाची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

 Maradona ready to give free training to Argentina

लोकांना वाटते मी आनंदी आहे; परंतु माझे हृदय अर्जेंटिनाच्या पराभवामुळे गहिवरलेले आहे. इतके खडतर प्रयत्न करून अपेक्षा उंचावतो आणि इतक्‍या सहजी त्याचे स्वप्नभंग होते याचे दुःख होते. 
- दिएगो मॅराडोना 

अर्जेंटिनाला मोफत प्रशिक्षण देण्याची मॅराडोनाची तयारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सोची - दिएगो मॅराडोना आठ वर्षांपूर्वी प्रशिक्षक असताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला अपयश आले होते. तरीही आता पुन्हा आपल्या संघाला प्रशिक्षण देण्यास आपण तयार आहोत आणि तेही मोफत, अशी घोषणा मॅराडोना यांनी केली आहे. 

रशियात सुरू असलेल्या यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्यात उपस्थित राहून संघाला पाठिंबा देणारे मॅराडोना कझान येथील सामन्यात फ्रान्सकडून झालेल्या पराभवामुळे दुःखी झाले होते. त्यानंतर त्यांनी लगेचच अर्जेंटिना संघाला मोफत प्रशिक्षण देण्याची इच्छा बोलून दाखवली विशेष म्हणजे विद्यमान प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पाओली यांचा करार 2022 पर्यंत आहे. 

2010 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत मॅराडोना अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षक होते; परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने अर्जेंटिनाचे आव्हान 4-0 असे संपुष्टात आणले होते. कोणत्याही मोबदल्याशिवाय संघाला प्रशिक्षण देण्याची आपली तयारी असल्याचे मॅराडोना यांनी एका टीव्ही शोमध्ये बोलताना स्पष्ट केले. 

1986 च्या स्पर्धेत अर्जेंटिनाला विश्‍वविजेतेपद मिळवून देणाऱ्या मॅराडोना यांच्याकडे अमिरातीमधील दोन क्‍लबना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या मॅराडोना यांची यंदाच्या स्पर्धेतील उपस्थितीही चर्चेचा विषय ठरत होती. अर्जेंटिनाने विजय मिळवताच प्रेक्षकांच्या दिशेने केलेले गैर हावभाव त्यानंतर व्हीआयपी कक्षातच रक्तदाब कमी झाल्यामुळे डॉक्‍टरांना करावे लागलेले उपचार याची चर्चा अजून ताजी आहे. 

लोकांना वाटते मी आनंदी आहे; परंतु माझे हृदय अर्जेंटिनाच्या पराभवामुळे गहिवरलेले आहे. इतके खडतर प्रयत्न करून अपेक्षा उंचावतो आणि इतक्‍या सहजी त्याचे स्वप्नभंग होते याचे दुःख होते. 
- दिएगो मॅराडोना