पहिल्या विजयासाठी ब्राझीलला करावी लागणार शर्थीची पराकाष्ठा 

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

स्वित्झर्लंड खेळाडूंकडून धसमुसळ्या खेळाचा फटका बसल्यानंतर काहीसा दुखापतग्रस्त झालेला नेमार बुधवारी पुन्हा सरावात परतला ही ब्राझीलसाठी आनंदाची बातमी आहे. सध्याचा ब्राझीलचा संघ स्टार खेळाडूंचा नाही; त्यामुळे नेमारसारख्या खेळाडूंची त्यांना गरज आहे आणि येथून पुढे त्यांना कोणतीही चूक भारी पडू शकते. 
 

स्वित्झर्लंड खेळाडूंकडून धसमुसळ्या खेळाचा फटका बसल्यानंतर काहीसा दुखापतग्रस्त झालेला नेमार बुधवारी पुन्हा सरावात परतला ही ब्राझीलसाठी आनंदाची बातमी आहे. सध्याचा ब्राझीलचा संघ स्टार खेळाडूंचा नाही; त्यामुळे नेमारसारख्या खेळाडूंची त्यांना गरज आहे आणि येथून पुढे त्यांना कोणतीही चूक भारी पडू शकते. 

अर्जेंटिनाप्रमाणे ब्राझीललाही पुढील दोन सामन्यांत आव्हानांचा सामना करायचा आहे. विजयाशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसेल. कॉस्टारिकाविरुद्धचा सामना तर त्यांचे अस्तित्व पणास लावणारा असेल. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विख्यात खेळाडूंविरुद्ध कसा खेळ करायचा याचा फॉर्म्युला लहान संघांना सापडला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात मार्किंग करणे आणि मध्यावरच त्यांना रोखून धरणे, त्यांना श्‍वास घेण्यासही जागा न देणे हा प्रचलित फॉर्म्युला आहे. युरोपियन संघ जे विजेतेपदाच्या शर्यतीत नाहीत ते संघ असा खेळ करत आहेत. 

युरोपियन संघ नसलेला मेक्‍सिको तसेच कॉस्टारिका ही त्याची चांगली उदाहरणे आहे. त्यामुळे ब्राझीलला शर्तीची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 2014 च्या स्पर्धेत केवळ आपल्या बचावात्मक खेळामुळे उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या कॉस्टारिकाने आपला पहिला सामना गमावला असला तरी ते ब्राझीलविरुद्ध 5-4-1 अशीच व्यूहरचना अमलात आणतील आणि ब्राझीलच्या आक्रमकांना रोखून धरण्याचा प्रयत्न करतील. 

ब्राझीलसाठी सातत्य महत्त्वाचे 
शुक्रवारच्या सामन्यातील बरोबरीही ब्राझीलच्या आव्हानाला धक्का देणारी ठरू शकेल, कारण त्यानंतर सर्बियाविरुद्ध त्यांचा अखेरचा साखळी सामना असेल आणि तो जिंकावाच लागेल; परंतु अखेरपर्यंत जीव टांगणीला लावण्यापेक्षा कॉस्टारिकाविरुद्धचा सामना ब्राझीलला जिंकावा लागणार आहे. जिजस, कुटिन्हो, विलियन आणि नेमार यांना अव्वल दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. गोल करण्याची एकही संधी त्यांना गमवावी लागणे महागात पडू शकते. कारण जेवढा वेळ ब्राझीलला गोल करण्यापासून दूर ठेवले जाईल तेवढा कॉस्टारिकाचा आत्मविश्‍वास वाढत जाईल. ब्राझीलच्या या आक्रमकांना पहिल्या सामन्यात टप्प्याटप्प्यात भेदकता दाखवली होती; परंतु आता सातत्य राखले तर कॉस्टारिकाच्या बचावफळीवर दडपण ठेवले; तर त्यांना गोल करता येतील. 

बचावही तेवढाच भक्कम हवा 
ब्राझील आणि अर्जेंटिना या संघांसाठी केवळ गोल करण्याचेच आव्हान असेल असे नाही; त्यांच्या बचावफळीनेही तेवढीच भक्कम कामगिरी करणे आवश्‍यक आहे. स्वीत्झर्लंडविरुद्ध ब्राझीलच्या बचावाने बऱ्यापैकी कामगिरी केली, तरी त्यांना बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला. विश्‍वकरंडकासारख्या स्पर्धेत जर प्रगती करायची असेल, तर मधल्या फळीने प्रतिस्पर्ध्यांना चाली करण्यापासून रोखणे आवश्‍यक असते. ब्राझीलसाठी 4-2-3-1 अशी रचना असेल व पौलिन्हो आघाडीवर असेल. कॉस्टारिकाविरुद्ध पारडे जड असले तरी ब्राझीलला सतर्क राहावे लागेल. 

कौशल्य, दैव, चिकाटी आणि जिद्द 
व्यूहरचना व्यतिरिक्त कौशल्य, दैव, चिकाटी आणि जिद्द यांचाही वाटा तेवढाच महत्त्वाचा असतो. विश्‍वकरंडक दर चार वर्षांनी येतो; त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याची पराकाष्ठा ठासून भरलेली असते. अशा प्रकारची मानसिकता काय करू शकते हे मी पाहिली आहे. मागचे विसरून ब्राझीलने उद्याचा विचार करायला हवा. पुढच्या फेरीचा विचार करण्याअगोदर पहिला विजय मिळवण्यावर त्यांनी अधिक भर द्यायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona writes about brazil