महागड्या पीएसजीसमोर बायर्न म्युनिक निष्प्रभ 

महागड्या पीएसजीसमोर बायर्न म्युनिक निष्प्रभ 

लंडन : पॅरीस सेंट जर्मन अर्थात पीएसजीच्या महागड्या आक्रमक फळीने युरोपातील ताकदवान संघात गणना होत असलेल्या बायर्न म्युनिकचा बचाव चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खिळखिळा केला. चेल्सीने पिछाडीनंतर ऍटलेटीको माद्रिदला हरवले, तर बार्सिलोनाने स्वयंगोलच्या जोरावर स्पोर्टिंग लिस्बनचा पाडाव केला. 

पाच वेळचे युरोपियन विजेते बायर्न आणि पीएसजी यांच्यातील लढत चुरशीची होईल, ही अपेक्षा फोल ठरली. जगज्जेत्या जर्मनीतील लीगवर हुकूमत राखणारे बायर्न अत्यंत महागड्या पीएसजीच्या आक्रमणास आव्हानही देऊ शकले नाहीत. मूळचे पीएसजीचे पण आता बायर्नचे मार्गदर्शक असलेले कार्लो ऍन्सेलीट्टो हे आपल्या माजी क्‍लबची व्यूहरचना भेदण्यात अपयशी ठरले. 

दुसऱ्याच मिनिटास नेमारच्या पासवर दानी अल्वेसने पीएसजीचे खाते उघडले. एडिसन कॅव्हानी याने विश्रांतीपूर्वी पीएसजीची आघाडी वाढवली. नेमारने मिनिटास गोल करीत विजय निश्‍चित केला. पीएसजीने दोन्ही लढती जिंकताना आठ गोल केले आहेत. पीएसजीविरुद्ध पाच गोल स्वीकारलेल्या सेल्टीकने अँडेरशेल्तविरुद्ध 0-3 हार पत्करली. स्कॉटिश विजेत्यांची गाडी या विजयामुळे रुळावर येईल अशी अपेक्षा आहे. 
रोमेलु लुकाकू याच्या दोन गोलमुळे मॅंचेस्टर युनायटेडने सीएसकेए, मॉस्कोला 4-1 असे सहज हरवले. लुकाकूने या मोसमात नऊ लढतीत दहा गोल केले आहेत.

सलामीला 0-3 पराजित झालेल्या बॅसेलने बेनफीकाचा 5-0 धुव्वा उडवत सर्वांचे लक्ष वेधले. बॅसेलने या स्पर्धेसाठी कॅमेरुनच्या दिमीत्री ओबेर्लीन याला साल्झबर्गकडून कर्जाऊ घेतले आहे. याच दिमित्री दोन गोल केले तसेच अन्य दोन गोलांत मोलाची भूमिका बजावली होती. 

नव्या स्टेडियमवर खेळत असल्याचा ऍटलेटीको माद्रिदचा आनंद चेल्सीने हिरावला. बदली खेळाडू मिशी बॅत्शुआय याने भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटास गोल करीत चेल्सीला विजयी केले. गेल्या महिन्यात चेल्सी सोडून ऍटलेटीकोकडे गेलेल्या दिएगो कोस्टाला राखीव खेळाडूच करण्यात आले होते. त्यातच ऍटलेटीकोने पूर्वार्धातील आघाडी तसेच वर्चस्व उत्तरार्धात गमावले. 

बार्सिलोनाने अपेक्षेनुसार स्पोर्टिंग लीस्बनला हरवले, पण त्यांना गोल करता आला नाही. लिओनेल मेस्सीने घेतलेल्या फ्री कीकवर चेंडू लिस्बनच्या बचावपटूस लागून गोलजाळ्यात गेला. युव्हेंटिसने ऑलिंपिकॉसचा 2-0 पाडाव केला खरा, पण अखेरच्या वीस मिनिटांतील दोन गोल सोडल्यास युव्हेंटिसला वर्चस्व राखता आले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com