esakal | यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंची पुन्हा 'एन्ट्री' 
sakal

बोलून बातमी शोधा

Representational image

यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंची पुन्हा 'एन्ट्री' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : यंदापासून पुन्हा छत्रपती शाहू स्टेडियमवर परदेशी फुटबॉलपटूंच्या पायातील जादू अनुभवता येणार आहे. तीन वर्षांपूर्वी स्थानिक संघांत परदेशी खेळाडूंना प्रवेशासाठी घातलेली बंदी कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने (केएसए) उठवली असून, एका संघात दोन परदेशी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी 'केएसए'तर्फे संघांना कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंची नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनकडे (विफा) फुटबॉल खेळाडूंचे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन ट्रान्स्फर 31 ऑगस्टपर्यंत करणे आवश्‍यक आहे. त्याची माहिती केएसए कार्यालयातर्फे देण्यात येईल. 

परदेशी खेळाडूंना स्थानिक संघांत प्रवेश नको, अशी मागणी वरिष्ठ गटातील संघांतर्फे 'केएसए'कडे करण्यात आली होती. त्यामुळे 2013-2014 ला परदेशी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. स्थानिक, राज्य व राज्याबाहेरील खेळाडूंना खेळविण्यात येत होते. काही संघांना परदेशी खेळाडू असावेत, असे वाटत होते. मात्र, तसे 'केएसए'ला पुन्हा कोण सांगणार, हाच प्रश्‍न होता. 'केएसए'ने यंदा मात्र परदेशी खेळाडूंना खेळविण्याची परवानगी दिली असून, हंगामात परदेशी खेळाडूंसाठी कोणते संघ प्रयत्न करणार, हे पाहायला मिळेल. 

वरिष्ठ गटातील संघांत नावनोंदणी करताना कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील खेळाडू म्हणून नोंदणी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूने 'विफा'कडून योग्य त्या कागदपत्रांसह खेळाडू नोंदणीबाबतचा मूळ ना हरकत दाखला देणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच त्याची स्थानिक संघांत नोंदणी करता येईल. एखाद्या खेळाडूस लोन बेसेस अंतर्गत जिल्ह्याबाहेरील खेळाडू म्हणून 'विफा'कडून ना हरकत दाखला दिल्यानंतर 'केएसए'कडे रीतसर वार्षिक नोंदणी करता येईल.

खेळाडूला मान्यता दिलेल्या कालावधीसाठीच संबंधित संघातून खेळता येईल. तसेच, 2017-18 या हंगामात नोंदणी झालेल्या कोणत्याही खेळाडूस बदली खेळाडूची सुविधा मिळणार नाही किंवा त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूस नोंदणी करता येणार नाही. बदली खेळाडू अंतर्गत एकूण पाच खेळाडूंची नोंदणी करता येईल. त्यांच्या जागी 'केएसए'कडे 2017-18 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू म्हणून 'ब' व 'क' गटात नोंदणी झालेल्या कोणत्याही खेळाडूची नोंदणी करता येईल. यातच जिल्ह्याबाहेरील खेळाडूंचा समावेश असून, त्यांनाही बदली करायचे असल्यास 'केएसए'च्या 'ब' व 'क' गटातील नोंदणीकृत खेळाडूंचीच नोंदणी करता येईल. तसेच, यात लोन बेसेस नोंदणी झालेल्या खेळाडूस बदली खेळाडूची सुविधा मिळणार नाही. 

बदली खेळाडूची सुविधा बंद 
केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल सामने संपल्यानंतर 30 मार्च 2018 ला बदली खेळाडूची नोंदणी करता येईल. त्याची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी सातपर्यंत राहील. नव्याने नोंदणी झालेले बदली खेळाडू पुढे येणाऱ्या नवीन फुटबॉल स्पर्धेपासूनच खेळू शकतील. दरम्यान, सुरू असणाऱ्या स्पर्धेत मधेच खेळता येणार नाही. 'विफा'च्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूवर कोणत्याही कारणाने कारवाई झाल्यास अथवा नोंदणी रद्द झाल्यास त्यास बदली खेळाडूची सुविधा मिळणार नाही. खेळाडूची जागा रिक्त राहील. यानंतर पुन्हा 'विफा'ने संबंधित खेळाडूची नोंदणी योग्य असल्याचे कळविले तरीही खेळाडूची नोंदणी 'केएसए'कडे होणार नाही.

loading image