मेस्सीला रोखण्यासाठी "मित्रा'चीच व्यूहरचना 

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

आपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या "मित्रा'चीच मदत घेत आहे. 
 

निझ्नी नोवगोरोड - आपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या "मित्रा'चीच मदत घेत आहे. 

सलामीला नायजेरियास हरवल्यामुळे क्रोएशियाचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. आता मेस्सीला रोखून आपली जागतिक फुटबॉलमधील ताकद उंचावण्याचा क्रोएशियाचा प्रयत्न असेल. दिएगो मॅराडोना हा विश्‍वकरंडक विजेता आहे. मेस्सीने तर एकही स्पर्धा अर्जेंटिनासाठी जिंकलेली नाही हे मेस्सीच्या चाहत्यांना ऐकावे लागत आहे. तो काही दिवसांत 31 वर्षांचा होईल. या परिस्थितीत ही त्याची अखेरची स्पर्धा असेल, असेच मानले जात आहे. 

ही लढत अर्जेंटिना-क्रोएशिया असली तरी तिला स्वरूप मेस्सीविरुद्ध क्रोएशिया हेच असणार. क्रोएशिया संघातील मध्यरक्षक इवान राकितीक हा बार्सिलोनाकडून खेळतो. त्याची जास्तीत जास्त मदत आम्ही घेत आहोत, असे क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्तको दालिक यांनी सांगितले. 

लिओनेल मेस्सीला रोखण्यासाठीचा कोणताही फॉर्म्युला नाही, त्यामुळे जेवढी माहिती असेल तेवढी कमीच आहे. त्यामुळेच या लढतीसाठी राकितीक जणू माझा सहायकच असेल. एक लक्षात ठेवा एक महान खेळाडू फुटबॉलमध्ये विजय देऊ शकत नाही, पण एक चांगला संघ नक्कीच यशस्वी होतो, असे ते म्हणाले. 

दालिक यांनी आपल्या खेळाडूंची ताकद ओळखून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे, तर मेस्सी, अँगेल डी मारिया, सर्जिओ ऍग्युएरा यांसारखे नावाजलेले खेळाडू असूनही चांगली कामगिरी करून अर्जेंटिना मार्गदर्शक जॉर्ज साम्पोली अपयशी ठरले आहेत. अर्जेंटिनास हरवले, तर क्रोएशिया थेट विजेतेपदाच्या संभाव्य शर्यतीत येईल. त्या तोडीचे खेळाडू आपल्याकडे आहेत, याची जाणीव त्यांना आहे, त्यामुळेच त्यांचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. सलामीच्या पराभवातून शिकलो आहोत, आमची यशस्वी होण्याची क्षमता आहे; हे साम्पोली सांगत असले तरी चाहत्यांना पुरेसा विश्‍वास वाटत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: messi's friend trying to prevent him