पीएसजीच्या विजयात नेमारचा देखणा गोल 

Neymar
Neymar

ब्रुसेल्स (बेल्जियम) : पॅरिस सेंट-जर्मेनने यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील अपराजित मालिका कायम राखली आहे. अँडरलेक्‍टवर चार गोलांनी मात करीत पीएसजीने आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. प्रमुख खेळाडू नेमार याचा फ्री-कीकवरील गोल वैशिष्ट्यपूर्ण ठरला. 

तिसऱ्याच मिनिटाला किलीयन एम्बापे याने खाते उघडल्यानंतर पीएसजीने उत्तरोत्तर खेळ उंचावला. दोन्ही सत्रांत प्रत्येकी दोन गोल नोंदवीत त्यांनी पकड कायम राखली. पीएसजीने नेमार, एम्बापे आणि एडिसन कॅव्हानी या त्रयीला मिळून 420 दशलक्ष डॉलर मोजल्याची चर्चा आहे. या तिघांनी गोल नोंदवीत चाहत्यांना खूश केले. बदली खेळाडू अँजेल डी मारिया याने दोन मिनिटे बाकी असताना लक्ष्य साधले. त्यामुळे पीएसजीचा दणदणीत विजय नक्की झाला. 

18 वर्षांच्या एम्बापे याने स्पर्धेतील आठवा गोल नोंदविला. तो स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा "टीनएजर' ठरला. बार्सिलोनाकडून गडगंज रकमेच्या करारावर आगमन झाल्यापासून नेमारने क्‍लबसाठी नववा गोल नोंदविला. 

अँडरलेक्‍ट ः 0 पराभूत वि. पॅरिस सेंट-जर्मेन (किलीयन एम्बापे 3, एडिसन कॅव्हानी 44, नेमार 66, अँजेल डी मारिया 88) 

दृष्टिक्षेपात 
- पीएसजी मागील मोसमात उप-उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनाकडून पराभूत 
- यंदा पीएसजी फॉर्मात 
- "ब' गटात तीन सामन्यांत 12 गोल 
- पीएसजीविरुद्ध अद्याप एकही गोल नाही 
- बायर्न म्युनीकपेक्षा पीएसजी तीन गुणांनी आघाडीवर 

पूर्वार्धात आमचे नियंत्रण परिपूर्ण नव्हते. काही वेळा आम्हाला प्रतिआक्रमणामुळे चकित व्हावे लागले. दुसऱ्या सत्रात आम्ही पकड भक्कम केली. तिसऱ्याच मिनिटाला गोल झाल्यानंतर आम्ही काहीसे भरकटलो होतो. यंदाच्या मोसमात एकही सामना सोपा नसेल याची आम्हाला जाणीव आहे. 
- उनाय एमेरी, पीएसजीचे प्रशिक्षक 

बायर्न म्युनिक विजयी 
म्युनिक : बायर्न म्युनिकने ब गटात सेल्टिकला तीन गोलांनी हरवून आपली गाडी रुळावर आणली. कर्णधार थॉमस मुलरने खाते उघडले. किमीचने हेडिंगवर गोल केला. हमेल्स यानेही हेडिंगवर लक्ष्य साधले. बायर्नने जुप हेन्चकेस यांची प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्‍लबला या स्पर्धेत पहिला विजय मिळाला. यापूर्वी 2013च्या चॅंपियन्स लीग अंतिम फेरीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बायर्नने अंतिम फेरीत बोरुशिया डॉर्टमुंडला हरविले होते. जुप 72 वर्षांचे असून, चार वर्षांच्या निवृत्तीनंतर त्यांनी बायर्नचे प्रशिक्षक म्हणून चौथ्यांदा कार्यकाळ सुरू केला. तीन आठवड्यांपूर्वी पीएसजीकडून 0-3 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर कार्लो ऍन्सेलॉट्टी यांची हकालपट्टी झाली होती. 
बायर्न म्युनिक ः 3 (थॉमस मुलर 17, जॉशुआ किमीच 29, मॅट हमेल्स 51) विवि सेल्टिक ः 0 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com