वडिलांचे अपहरण होऊनही 'तो' खेळला फुटबॉल विश्वकरंडक

वृत्तसंस्था
Wednesday, 4 July 2018

''मी पोलिसांना सांगितले तर वडिलांना गोळी मारण्याची धमकी मला दिली होती. मला ही गोष्ट डोक्यातून काढून सामन्यात माझ्या देशाचे नेतृत्व करणे गरजेचे होते. त्यामुळे मी ही घटना माझे सहकारी आणि मार्गदर्शकांपासून लपवून ठेवली.''  

सेंटपीटर्सबर्ग : वडिलांचे निधन होउनही 1999चा विश्वकरंडक खेळणारा सचिन तेंडुलकर असो किंवा नुकत्याच जन्मलेल्या मुलीला न भेटता 2015च्या विश्वकरंकासाठी रवाना होणारा धोनी असो, आता विश्वकरंडकात कुटुंबापेक्षाही देशाला प्राधान्य देणारे अनेक खेळाडू आपण भारतात पाहिले आहेत. नायजेरीयाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार जॉन ओबी मिकेलही याला अपवाद नाही. अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्याच्या आधी मिकेलच्या वडिलांचे अपहरण झाले तरीही त्याने कोणालाही याबाबत न सांगता सामना खेळला.
 
अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्याच्या चार तास आधी मिकेलला मायदेशी असलेल्या आपल्या वडिलांचे अपहरण झाल्याची बातमी कळाली होती. मंगळवारी याविषयी बोलताना तो म्हणाला, ''मी पोलिसांना सांगितले तर वडिलांना गोळी मारण्याची धमकी मला दिली होती. मला ही गोष्ट डोक्यातून काढून सामन्यात माझ्या देशाचे नेतृत्व करणे गरजेचे होते. त्यामुळे मी ही घटना माझे सहकारी आणि मार्गदर्शकांपासून लपवून ठेवली.''  

सोमवारी नायजेरियाच्या पोलिसांनी नैऋत्येकडील नेग्यू राज्यातून त्याचे वडिल मायकल मिकेल यांची सुटका केली. त्यांचे अपहरण होण्याची ही दुसरी वेळ होती. नेग्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिशेल मिकेल आणि त्यांचा चालक यांची दुपारी 2.30 वाजता इजिडी-युडी जंगलातून सुखरुप सुटका करण्यात आली. नायजेरियामध्ये पैश्यांसाठी अपहरण होणे ही सामान्य बाब आहे असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigeria Captain Hid Dad’s Abduction, Played World Cup Match