विश्‍वकरंडकात आता मेस्सी-रोनाल्डो लढत ?

वृत्तसंस्था
Thursday, 28 June 2018

थोडक्‍यात 
-मेस्सी-रोनाल्डो विश्‍वकरंडकात एकदाही आमने सामने नाहीत 
-रशियात हे साध्य होण्यासारखे; पण दोघांना बाद फेरीत विजय मिळवणे आवश्‍यक 
-रोनाल्डोचे स्पर्धेत आतापर्यंत चार गोल; मेस्सीचा केवळ एक 
-दोघांकडून एकेक पेनल्टी व्यर्थ 

 

मॉस्को - फुटबॉल खेळ हा निःसंशयपणे सांघिक खेळ असला तरी अलीकडच्या काळातील मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांची नावे आली की तो वैयक्तिक कौशल्यावर येऊन ठेपतो. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांची सुरू असलेली आगेकूच अशीच कायम राहिल्यास फुटबॉलप्रेमींना मेस्सी-रोनाल्डो लढत बघायला मिळेल. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत हे दोन्ही संघ समोरा समोर येण्यापासून केवळ एक विजय दूर आहेत. बाद फेरीतील या दोन्ही संघांनी आपला सामना जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत ते एकमेकांसमोर उभे ठाकतील. विश्‍वकरंडक स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. सर्वोत्तम खेळ करत संघांनी बाद फेरीत धडक मारली आहे. प्रत्येकाचे विजेतेपद हे एकच उद्दिष्ट असले, तरी विजेता ठरण्यापूर्वी फुटबॉल प्रेमींना आता विश्‍वकरंडकात मेस्सी-रोनाल्डो समोरासमोर येणार का ? हाच प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे त्यांना आता अर्जेंटिना-पोर्तुगाल लढतीचे वेध लागले आहेत. 

व्यावसायिक फुटबॉल खेळताना मेस्सी-रोनाल्डो भलेही अनेकदा समोरासमोर आले असतील, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून ते एकमेकांसमोर आलेले नाहीत. यंदाच्या स्पर्धेत रोनाल्डो पहिल्या सामन्यापासून भरात आहे, तर मेस्सीला नायजेरियाविरुद्ध लय गवसली आहे. रोनाल्डोला केवळ इराणविरुद्ध गोल करण्यात अपयश आले आहे. यंदाच्या स्पर्धेत दोघांच्या कामगिरीत एकच साम्य आहे की, या स्पर्धेत दोघांनी एकेक पेनल्टी चुकवली आहे. 

थोडक्‍यात 
-मेस्सी-रोनाल्डो विश्‍वकरंडकात एकदाही आमने सामने नाहीत 
-रशियात हे साध्य होण्यासारखे; पण दोघांना बाद फेरीत विजय मिळवणे आवश्‍यक 
-रोनाल्डोचे स्पर्धेत आतापर्यंत चार गोल; मेस्सीचा केवळ एक 
-दोघांकडून एकेक पेनल्टी व्यर्थ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now Messi vs Ronaldo in the football World Cup 2018?