पावसाचा ब्रेक, इंग्लंडचा गोल वर्षाव हॅरी केनची हॅट्ट्रिक, माजी विजेत्यांचे पूर्वार्धातच पाच गोल

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील इंग्लंड-पनामा लढतीच्या फॅन झोनसाठी चाहते गर्दी करीत असतानाच पनामात जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे ते निराश झाले होते, पण लढत सुरू होण्याच्या सुमारास पाऊस थांबला, पण त्यानंतर झालेल्या इंग्लंडच्या गोलवर्षावाने पनामाचे चाहते जास्त खच्ची झाले.

निझनी नोवगोरोड, ता. 24 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील इंग्लंड-पनामा लढतीच्या फॅन झोनसाठी चाहते गर्दी करीत असतानाच पनामात जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे ते निराश झाले होते, पण लढत सुरू होण्याच्या सुमारास पाऊस थांबला, पण त्यानंतर झालेल्या इंग्लंडच्या गोलवर्षावाने पनामाचे चाहते जास्त खच्ची झाले.

हॅरी केन याची हॅट्ट्रिक आणि बचावपटू जॉन स्टोन यांच्या दोन गोलमुळे इंग्लंडने अर्धा डझन गोलचा तडाखा पनामास दिला. प्रीमियर लीगमधील एकही अव्वल खेळाडू संघात नसल्यामुळे या लीगमधील वादंगाचा संघर्ष इंग्लंडला बसणार नाही हे त्यांनी ट्युनिशियाविरुद्ध दाखवले होते. आता या ताज्यातवान्या खेळाडूंनी आपण डार्क हॉर्स असल्याची जाणीव पुन्हा प्रतिस्पर्ध्यांना करून दिली.

इंग्लंडचे ट्युनिशियाविरुद्ध खेळताना सातत्य नव्हते, पण या वेळी त्यांनी पनामाला पूर्वार्धात कोणतीही दयामाया दाखवली नाही. सेट पिसेसबरोबरच चांगले वैयक्तिक कौशल्य दाखवताना इंग्लंडचे खेळाडू जणू आपली ताकद प्रीमियर लीगमधील संघांना दाखवत होते. इंग्लंडची एकतर्फी हुकूमत पाहून पनामाचे खेळाडू खच्ची झाले. त्यांना धसमुसळ्या खेळाचाही पुरेसा फायदा होत नव्हता. चेंडूवरील वर्चस्व गमावल्यावर सतत फाउलची मागणी करीत ते आपलेच लक्ष विचलित करीत होते. त्याचा त्यांना फटका बसला. त्यांनी संधी निर्माण करण्यासाठी इंग्लंडला वाव दिला. त्याचा फायदा त्यांनी पुरेपूर घेतला. हॅरी केनची हॅट्ट्रिक उत्तरार्धात पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडने लगेच त्याला बदलले आणि खेळाचा वेग कमी केला. त्याचा फायदा घेत पनामाने एक गोल केला खरा, पण त्याचा त्यांनीही फारसा जल्लोष केला नाही.

लक्षवेधक
- हॅरी केन याने विश्‍वकरंडकातील इंग्लंडची तिसरी हॅट्ट्रिक नोंदवली
- यापूर्वी जेफ हर्स्ट (1966 ची अंतिम लढत) आणि गॅरी लिनेकर (1986)
- केनचे यंदाच्या स्पर्धेत आता सर्वाधिक - पाच - गोल, - पाचही - शॉट्‌स ऑन टार्गेटवर गोल
- विश्‍वकरंडकातील पहिल्या लढतीत किमान दोन गोल करणारा हा दुसरा खेळाडू. यापूर्वी पोलंडचा ग्रिझगॉर्झ लॅतो (1974)
- विश्‍वकरंडक स्पर्धेत एकाच संघाने पूर्वार्धात पाच गोल करण्याची ही पाचवी वेळ, यापूर्वी जर्मनीने ही कामगिरी ब्राझीलविरुद्ध 2014 च्या स्पर्धेत
- केन याचा पेनल्टी किकवर गोल, निर्धारित वेळेत इंग्लंडचा पेनल्टी किकवर 2002 च्या स्पर्धेनंतर प्रथमच गोल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panama hammered by England in World Cup