क्‍लासिको मेस्सी नाबाद पाचशे 

वृत्तसंस्था
Tuesday, 25 April 2017

मेस्सी मॅजिक चल गया 
- बार्सिलोनाकडून 500 गोल 577 लढतींत 
- ला लीगामध्ये 343 सर्वाधिक गोलचा पराक्रम 
- बार्सिलोना-रेयाल लढतीत सर्वाधिक 23 गोलचा विक्रम 
- ला लीगाच्या या मोसमात 31 गोल; तर चॅंपियन्स लीगमध्ये सर्वाधिक 11 गोल 
- या मोसमात 46 सामन्यांत 47 गोल 
- 2009 पासून त्याला राईट विंगरऐवजी मैदानाच्या मध्यभागी आणले, तेव्हापासून दर सामन्यामागे किमान एक गोल 
 

माद्रिद - लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाकडून पाचशेवा गोल करण्याचा पराक्रम केला. हा पराक्रम करतानाच त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिदला हार मानण्यास भाग पाडले. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील लढत बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच मेस्सीने भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास हा गोल केला. 

माद्रिदचे पाठीराखे जेम्स रॉड्रिगेझच्या गोलचा आनंद साजरा करीत असतानाच मेस्सीने हा अफलातून गोल केला. खरे तर 77व्या मिनिटास माद्रिदचा कर्णधार सर्जीओ रामोस याला मेस्सीला धक्का दिल्याबद्दल मैदानाबाहेर काढण्यात आले होते, त्या वेळी बार्सिलोना 2-1 आघाडीवर होते; पण रॉड्रिगुएझ याने 86व्या मिनिटास माद्रिदला बरोबरी साधून दिली होती. 

मेस्सीने बारा सेकंद बाकी असताना गोलच केला नाही, तर रेयालच्या सर्व योजना हाणून पाडल्या. रेयालने मेस्सीची कोंडी करण्यासाठी धसमुसळा खेळ करण्याचे ठरवले होते, तरीही मेस्सीने दोन गोल केले, सहा शॉटस्‌ गोलच्या दिशेने मारले, त्यातील चार ऑन टार्गेट होते. त्याच्या सात ड्रिबल सामन्यात सर्वाधिक होत्या; तर त्याने 72 टच रेयालच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त होते. पूर्वार्धात मेस्सीच्या तोंडावर जोरदार प्रहार झाला होता, तरीही तोच रक्ताळलेला चेहरा घेऊन तो खेळला. 

मेस्सी वि. रोनाल्डो असेच संबोधल्या जाणाऱ्या लढतीत दोघांनीही गोल करण्याच्या संधी सामन्याच्या सुरवातीस दवडल्या होत्या. त्यातच प्रतिस्पर्धी गोलरक्षक बहरले. त्यातही बार्सिलोना गोलरक्षक तेर स्टेगन याने 12 शॉटस्‌ रोखले. त्यात रोनाल्डोचेही प्रयत्न होते; मात्र अखेरीस बार्सिलोनाची चेंडूवरील जास्त हुकमत (58-42) ही रेयालने गोलच्या निर्माण केलेल्या संधींपेक्षा सरस ठरली. 

मेस्सी मॅजिक चल गया 
- बार्सिलोनाकडून 500 गोल 577 लढतींत 
- ला लीगामध्ये 343 सर्वाधिक गोलचा पराक्रम 
- बार्सिलोना-रेयाल लढतीत सर्वाधिक 23 गोलचा विक्रम 
- ला लीगाच्या या मोसमात 31 गोल; तर चॅंपियन्स लीगमध्ये सर्वाधिक 11 गोल 
- या मोसमात 46 सामन्यांत 47 गोल 
- 2009 पासून त्याला राईट विंगरऐवजी मैदानाच्या मध्यभागी आणले, तेव्हापासून दर सामन्यामागे किमान एक गोल 
- 2011-12 च्या मोसमात 60 सामन्यांत 73 गोल, ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 
- 2012 या वर्षात सर्वाधिक 91 गोलचा विक्रम 
- मेस्सी आल्यापासून बार्सिलोनाची 29 विजेतेपदे, त्यात आठ ला-लीगा आणि चार चॅंपियन्स लीग जेतेपदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recapping Lionel Messi’s incredible El Clasico performance