सफाई कामगाराने अडवले रोनाल्डोला

वृत्तसंस्था
Wednesday, 27 June 2018

मॉस्को, ता. 26 ः विश्‍वकरंडक स्पर्धेत सोमवारी पोर्तुगालच्या स्टार रोनाल्डोची पेनल्टी किक शिताफीने अडवून इराणचा गोलरक्षक अलीरजा बेरिनवेंड एकदम प्रकाशझोतात आला.

मॉस्को, ता. 26 ः विश्‍वकरंडक स्पर्धेत सोमवारी पोर्तुगालच्या स्टार रोनाल्डोची पेनल्टी किक शिताफीने अडवून इराणचा गोलरक्षक अलीरजा बेरिनवेंड एकदम प्रकाशझोतात आला.

या एका यशस्वी कामगिरीने फुटबॉल विश्‍वात तो ओळखला जाऊ लागला; पण दस्तुरखुद्द रोनाल्डोला अडवणारा बेरिनवेंडचा इथपर्यंतचा प्रवास मात्र कठीण होता. अनेक कष्टातून आणि कठोर मेहनतीने बेरिनवेंड इथपर्यंत पोचला आहे.

इराणमधील बंजारा परिवारात बेरिनवेंडचा जन्म झाला. फुटबॉलची आवड जोपासण्यासाठी त्याला अनेक दिव्यातून जावे लागले. त्यासाठी तो कधी रस्त्यावर झोपला, तर कधी रस्त्याची सफाई केली. वेळ पडली तेव्हा त्याने रस्त्यावरील गाड्याही धुतल्या. त्यापूर्वी तो वयाच्या बाराव्या वर्षांपासून बकऱ्या चरायला नेण्याचे काम करत होता. वडिलांना फुटबॉल आवडत नव्हते. फुटबॉल प्रेमसाठी मग तो घरातून पळून गेला आणि त्याच्या फुटबॉल प्रवासाला सुरवात झाली.

स्ट्रायकर म्हणून त्याने सुरवात केली. एका सामन्यात राखीव गोलरक्षक म्हणून तो उतरला. त्या वेळी त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली आणि तेव्हापासून तो गोलरक्षक म्हणूनच ओळखला जाऊ लागला. प्रशिक्षण घेत असताना क्‍लबमधून खेळताना त्याची राहण्याची सोय झाली नाही त्यामुळे तो रस्त्यावर झोपू लागला. काम करण्यासाठी त्याने रस्ताच नाही, तर मिळेल त्या दुकानात झाडू मारण्याचे काम केले. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत राष्ट्रीय संघात त्याने स्थान मिळविले आणि रोनाल्डोची किक अडवून तो आता "हिरो' ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ronaldo's goal stopped by cleaner