रशिया बाद फेरीच्या उंबरठ्यावर उत्तरार्धातील तुफानी खेळाने इजिप्तवर विजय

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या रशिया संघाने स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र आपला दबदबा राखायला सुरवात केली आहे. "अ' गटातील सलग दुसरा विजय मिळविताना त्यांनी आपला बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे. 

सेंट पीटसबर्ग - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या रशिया संघाने स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र आपला दबदबा राखायला सुरवात केली आहे. "अ' गटातील सलग दुसरा विजय मिळविताना त्यांनी आपला बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे. 

यजमानांनी गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात इजिप्तचा 3-1 असा पराभव केला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत गेल्यानंतर उत्तरार्धात रशियाच्या आक्रमणाला चाहत्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे वेगळीच धार चढली. पंधरा मिनिटांच्या अंतराने त्यांनी तीन गोल करून आपला विजय निश्‍चित केला. इजिप्त संघ आज भलेही त्यांचा आधारस्तंभ मो सलाह याला घेऊन खेळले. पण, त्याला प्रभाव पाडता आला नाही. रशियाच्या बचावपटूंच्या कोंडाळ्यातच अडकून पडलेल्या सलाहला "वार'च्या निर्णयानंतर मिळालेल्या पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी मिळाली.

सामन्यातील पूर्वार्ध चांगलाच संघर्षपूर्ण झाला. एकमेकांची ताकद ओळखणे हा यामागचा कदाचित उद्देश असू शकतो. पण, याचा फायदा उत्तरार्धात रशियाने घेतला. उत्तरार्धात खेळ सुरू होऊन दोन मिनिटांचा खेळ होत नाही तो रशियाला ब्रेक थ्रू मिळाला. रशियाच्या ऍलेक्‍झांडर गोलोविनचा क्रास इजिप्तचा गोलरक्षक शेनावी याने पंच केला. रिबाउंड झालेल्या चेंडूला रोमन झुबिनने हेडरने दिशा दिली. चेंडू वेगाने बाहेर चालला होता. मात्र, त्याच वेळेस पुढे आलेल्या अहमद फाथीच्या पायाचा लागून चेंडूची दिशा बदलली आणि थेट जाळीचा वेध घेतला. यंदाच्या स्पर्धेतील हा पाचवा स्वयंगोल ठरला. 

रशिया पहिल्या गोलसाठी सुदैवी ठरले, तर दुसरा गोल त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देणारा होता. या वेळी ऍलेक्‍झांडर सेमडोव याने मारियो फर्नांडिसकडे दिला. त्याने कोलवर पास देत डेनिस चेरिशेवला पास दिला आणि त्याने चेंडूला अचूक जाळीची दिशा देत स्पर्धेतील आपला तिसरा गोल केला. दोनच मिनिटांनी आर्टेम झुबाने इजिप्तच्या बचावपटूंना चकवून तिसरा गोल केला. स्पर्धेपूर्वी चर्चेत राहिलेला मो सालह या सामन्यात खेळला; पण तो इजिप्तचा तारणहार बनू शकला नाही. रशियन खेळाडूंनी त्याला "मार्क' करून त्याची कोंडी केली. एकच संधी सलाहला मिळाली. त्या वेळी त्याला अडथळा आणताना रशियाची चूक झाली आणि मिळालेल्या पेनल्टीवर सालाहने गोल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia vs egypt russia win the match