सलामीला महाराष्ट्राचे मिझोरामसमोर नमते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पणजी - नियोजनबद्ध आणि चपळ खेळ केलेल्या मिझोरामसमोर महाराष्ट्राला संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या "ब' गटात सोमवारी नमते घ्यावे लागले. बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ईशान्य भारतातील संघाने 3-1 असा चमकदार विजय प्राप्त केला.

पणजी - नियोजनबद्ध आणि चपळ खेळ केलेल्या मिझोरामसमोर महाराष्ट्राला संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या "ब' गटात सोमवारी नमते घ्यावे लागले. बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ईशान्य भारतातील संघाने 3-1 असा चमकदार विजय प्राप्त केला.

मिझोरामने पूर्वार्धातील खेळात 2-1 अशी आघाडी मिळविली होती. त्यांच्यासाठी सातव्या मिनिटास व्ही. लालचुआनॉमा वनछॉंग याने, 43व्या मिनिटास लालफाकझुआला फाकझुआला याने, तर 51व्या मिनिटास लालसांगबेरा सांगबेरा याने प्रत्येकी एक गोल नोंदविला. महाराष्ट्राचा एकमात्र गोल 11व्या मिनिटास संघातील 21 वर्षांखालील खेळाडू राहुल दास याने केला. सामन्याच्या 78व्या मिनिटास मिझोरामच्या लालबियाखलुआ याला अगदी सोपी संधी होती; पण तो नियंत्रित फटका मारू शकला नाही, त्यामुळे त्यांचा विजय 3-1 फरकापुरता मर्यादित राहिला.

गतवर्षी स्पर्धेत उपविजेत्या आणि तीन वेळच्या माजी विजेत्या महाराष्ट्राला आज सूर गवसला नाही. गॉडफ्रे परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खेळात समन्वयाचा अभाव होता. त्याचा लाभ मिझोरामने उठविला. महाराष्ट्राच्या सेबिन व्हर्गिस याने "बॅकहेड'द्वारे गोलरक्षक हर्षद मेहेर याच्याकडे चेंडू देण्याचा प्रयत्न केला; पण गोलरक्षक चेंडू रोखण्यात सपशेल अपयशी ठरला. ही संधी साधत लालछुआनॉमा याने मिझोरामचे खाते उघडले. मिझोरामच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत राहुल दासने महाराष्ट्रास बरोबरी साधून दिली. अर्धा तासाच्या खेळानंतर महाराष्ट्राला आघाडीची संधी होती; परंतु अभिषेक आंबेकर योग्यवेळी चेंडूला हेडरने अचूक दिशा दाखवू शकला नाही. नंतर मात्र 2013-14 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या मिझोरामने महाराष्ट्राला वरचढ होऊ दिले नाही.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना मिझोरामने आघाडी वाढविली. लालबियाखलुआ याच्या "असिस्ट'वर फाकझुआला याची "व्हॉली' अडविताना गोलरक्षक हर्षद पुरता गडबडला व गोलबरोबरीची कोंडी फुटली. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटास मिझोरामची आघाडी 3-1 अशी मजबूत झाली. "विंग'मध्ये मेहनत घेतलेल्या सांगबेरा याला यश मिळाले. फाकझुआला याच्या शानदार "असिस्ट'वर सांगबेरा याने महाराष्ट्राच्या गोलरक्षकाला अजिबात संधी दिली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh karandak football competition