गोव्याची बंगालशी गोलशून्य बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 March 2017

दोन्ही संघांची बचावफळी ठरली भक्कम; सेनादलाची चंडीगडवर मात

दोन्ही संघांची बचावफळी ठरली भक्कम; सेनादलाची चंडीगडवर मात
पणजी - गोवा, तसेच बंगाल संघाच्या खेळाडूंच्या भक्कम बचावामुळे संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी या दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. हा सामना बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झाला. "अ' गटातील आणखी एका सामन्यात गतविजेत्या सेनादलाने चंडीगडला एका गोलने निसटते हरविले.

गतविजेत्या सेनादल संघाचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. सामन्याच्या आठव्या मिनिटास फ्रान्सिस झौन्तलुआंगा याने पेनल्टी फटक्‍यावर नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. 31 वेळा संतोष करंडक जिंकलेल्या बंगालचे आता अ गटात तीन सामन्यांनंतर सर्वाधिक सात गुण झाले आहेत. उपांत्य फेरी गाठण्याची त्यांना जास्त संधी आहे. गोव्याचे दोन सामन्यांतून चार गुण झाले असून सेनादल व चंडीगडच्या खाती प्रत्येकी तीन गुण आहेत. मेघालयास दोन्ही सामने गमवावे लागले आहेत. गोव्याचा पुढील सामना शनिवारी (ता. 18) चंडीगडशी होईल, तर त्याच दिवशी मेघालय व सेनादल यांच्यात सामना होईल.

गोलशून्य बरोबरी
गोलशून्य बरोबरीत गोवा व बंगालने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला; परंतु बचावफळीचे वर्चस्व कायम राहिले. गोव्याने एक गुण मिळविला, तरीही त्यांना अपेक्षापूर्ती करणारा खेळ करता आला नाही. आघाडीफळीतील गोव्याचा हुकमी एक्का लिस्टन कुलासो याच्यावर बंगालच्या बचावपटूंचा सक्त पहारा होता. विशेषतः प्रोवात लाक्रा याने लिस्टनवर जास्त नजर ठेवली होती. सामन्याच्या भरपाई वेळेत गोव्याला दोन वेळा बरोबरीची कोंडी फोडण्याची संधी होती, मात्र बंगालचा गोलरक्षक शंकर रॉय याची कामगिरी दक्ष ठरली. त्याने कॅजिटन फर्नांडिसचा फ्रीकिक फटका अडविला, नंतर लिस्टनचा फटकाही रोखून धरला.

सामन्याच्या उत्तरार्धात बंगालच्या मानवीर सिंग याने धारदार खेळ केला. त्याला एस. रोनाल्ड सिंग आणि एम. बसंत सिंग यांची सुरेख साथ मिळाली. त्यामुळे गोव्याच्या बचावफळीवर दबाव आला, मात्र मेल्विन लोबो व पीटर कार्व्हालो यांचा बचावफळीत अनुभव सरस ठरला. सत्तराव्या मिनिटास रोनाल्ड सिंगच्या क्रॉसपासवर मानवीर सिंगचा हेडर थोडक्‍यात हुकला. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत गोव्याच्या कॅजिटन फर्नांडिस, लिस्टन कुलासो व बदली खेळाडू ब्रायन मस्कारेन्हास यांनी बंगालला चांगलेच सतावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh karandak football competition