गोव्यात चौथ्यांदा संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 March 2017

पणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची मुख्य साखळी फेरी रविवारपासून (ता. 12) गोव्यात रंगणार आहे. सामने बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर तसेच वास्को येथील टिळक मैदानावर खेळविले जातील. काही सामने नावेली येथील मैदानावरही होतील.

पणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची मुख्य साखळी फेरी रविवारपासून (ता. 12) गोव्यात रंगणार आहे. सामने बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर तसेच वास्को येथील टिळक मैदानावर खेळविले जातील. काही सामने नावेली येथील मैदानावरही होतील.

गोव्यात चौथ्यांदा ही स्पर्धा होत आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनने यापूर्वी 1996 मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद शेवटच्या वेळेस भूषविले होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर ही स्पर्धा राज्यात होत आहे. स्थानिक आयोजन समितीची बुधवारी राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी स्पर्धा आयोजनासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. स्पर्धेचा अंतिम सामना 25 मार्चला खेळला जाईल.

गोव्याचे स्पर्धेतील सर्व सामने बांबोळी येथील मैदानावर होतील. याच मैदानावर उपांत्य व अंतिम फेरीतील सामने प्रकाशझोताखाली होतील.

'आजची बैठक सकारात्मक ठरली. सहकार्याबद्दल आम्ही मुख्य सचिव, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक, तसेच सर्व संबंधित सरकारी विभागाचे आभार मानतो,'' असे गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव वेल्विन मिनेझिस यांनी बैठकीनंतर सांगितले. स्पर्धा जिंकणे हे गोव्याचे लक्ष्य राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्य साखळी फेरीसाठी पाच विभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण दहा संघ पात्र ठरले आहेत. "अ' गटात गतविजेत्या सेनादलासह मेघालय, बंगाल, चंडीगड व यजमान गोव्याचा समावेश आहे. "ब' गटात गतउपविजेत्या महाराष्ट्रासह केरळ, मिझोराम, रेल्वे व पंजाब या संघांचा समावेश आहे. रविवारी स्पर्धेतील पहिला सामना गोव्याचा पहिला सामना मेघालयविरुद्ध होईल. त्याचदिवशी चंडीगड व बंगाल यांच्यात लढत होईल.

यजमान गोव्याने ही स्पर्धा पाच वेळा जिंकलेली आहे. पश्‍चिम बंगालने सर्वाधिक 31 वेळा जिंकलेली आहे. पंजाबने आठ वेळा, तर केरळ व सेनादलाने प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद मिळविले आहे. 2008-09 मध्ये गोव्याने शेवटच्या वेळेस ही स्पर्धा जिंकली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh karandak football competition in goa