क्रोएशियाच्या जल्लोषाने सर्बिया सरकार संतप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

बेलग्रेड, ता. 22 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनास हरवल्यावर क्रोएशिया खेळाडूंनी आनंद व्यक्त करणे स्वाभाविकच होते; पण त्या वेळी त्यांनी सर्बियाला लक्ष्य करणारी गाणी म्हटल्याने सर्बिया सरकार संतप्त झाले आहे. क्रोएशियाचा बचावपटू देना लॉवरेन हा सहकाऱ्यांसह गाणी म्हणत असल्याची क्‍लीप व्हायरल झाली आहे. त्यापैकी एका गाण्यात क्रोएशियातील प्रसिद्ध गायक थॉम्पसन याने काही घोषणा दिल्या आहेत. त्या प्रामुख्याने क्रोएशियात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी नाझींना समर्थन दिल्यासाठी जात असत. त्यातच सर्बियन डाकूंना देशाबाहेर घालवा, जोपर्यंत ते जात नाहीत तोपर्यंत त्याचा पाठलाग करा; अशा अर्थाचे शब्द आहेत. सर्बिया आणि क्रोएशिया हे अस्तंगत युगोस्लावियातील भाग आहेत.

त्यांच्यात नव्वदच्या दशकात जोरदार संघर्ष झाला होता. आता त्याच्या आठवणीच जागृत झाल्यामुळे सर्बियात संतापाची लाट पसरली. सर्बिया अध्यक्षांनी त्यात उडी घेतली. काहींना आपल्या शेजाऱ्याची हुर्यो करूनच आनंद साजरा करता येतो. मी त्यांच्या जागी असतो, तर केवळ विजयाचा आनंद साजरा केला असता असे त्यांनी म्हटले आहे. या दोन देशांत स्पर्धेच्या बाद फेरीत लढत होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serbia government angry on Croatia football team