पराभवानंतर सर्बियांची पंचांविरुद्ध तक्रार

वृत्तसंस्था
Monday, 25 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्वित्झर्लंडकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्बिया फुटबॉल संघटनेने पंच फेलिक्‍स ब्रीच यांच्याविरुद्ध "फिफा'कडे तक्रार केली आहे. 
 

कलिननग्राड (रशिया) - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्वित्झर्लंडकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्बिया फुटबॉल संघटनेने पंच फेलिक्‍स ब्रीच यांच्याविरुद्ध "फिफा'कडे तक्रार केली आहे. 

या पराभवाने सर्बियाचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंग पावले. "पंचाविरुद्ध तक्रार करताना आम्ही सात वेगवेगळ्या व्हिडिओ क्‍लिपिंग "फिफा'कडे पाठविल्या आहेत. यामध्ये ब्रीच यांनी घेतलेले निर्णय आमच्या विरुद्ध कसे होते, हे स्पष्ट होते,' असे सर्बिया फुटबॉल संघटनेने "फिफा'ला पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पंच ब्लीच यांनी आमच्या प्रमुख खेळाडूंविरुद्ध यलो कार्ड दाखवताना नेहमीच घाई केलीय, याउलट त्यांनी स्वित्झर्लंडच्या खेळाडूंसाठी हातचे राखूनच निर्णय घेतले, असा सर्बियाच्या तक्रारीचा सूर आहे. यानंतरही खरी तक्रार त्यांची उत्तरार्धात मिट्रोविच याला पेनल्टी नाकारण्याबाबत आहे. पंचांनी त्या वेळी व्हिडिओ पंचाशी चर्चा करणेदेखील टाळले. 

या सामन्यातील बरोबरीनंतर आता अखेरच्या सामन्यात त्यांना ब्राझीलला बरोबरीत रोखावे लागेल आणि स्वित्झर्लंड कोस्टारिकाविरुद्ध हरायला हवे, असे झाले तर सर्बियाला बाद फेरीत प्रवेश मिळू शकतो. 

"वार'चा उपयोगाबाबत प्रश्‍नचिन्ह 
मैदानावरील कठीण निर्णयासाठी व्हिडिओ पंचांशी चर्चा करणे, या उद्देशाने या स्पर्धेपासून "वार'चा उपयोग केला जात आहे. मात्र, हा उपायोग निवडक देश आणि सामन्यांपुरताच होत असल्याने त्याच्या उपयोगाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मागणी केल्यानंतरही "वार'चा उपयोग न केल्यामुळे सर्बियाने केवळ आमच्याविरुद्धच याचा उपयोग टाळण्यात आल्याचे स्पष्टपणे तक्रारीत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serbia questions refereeing in defeat to Switzerland appeals to FIFA