esakal | जर्मनीस ऑस्ट्रेलियाने झुंजवले
sakal

बोलून बातमी शोधा

जर्मनीस ऑस्ट्रेलियाने झुंजवले

जर्मनीस ऑस्ट्रेलियाने झुंजवले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोची - जगज्जेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन्स करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी नवोदितांचा संघ निवडला आहे. त्यांना या स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या कडव्या आव्हानास सामोरे जावे लागले; पण त्यांनी ३-२ बाजी मारली.

जर्मनीचे मार्गदर्शक जोकीम लोव यांनी रशियातील या स्पर्धेसाठी अर्धा डझन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. अर्थातच, रशियात आलेले नवोदित पुढील वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी संधी दवडल्या नसत्या, तर सफाईदार विजय नक्कीच लाभला असता.

पूर्वार्धात खेळ खूपच चांगला झाला; पण त्यानंतर पकड निसटली. यानंतरही नवोदितांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले, हे मान्य करावेच लागेल. ते विजयासाठी खूपच आसुसलेले आहेत. आक्रमणास सतत तयार असतात, असे लोव यांनी सांगितले. अनेक जण पहिल्यांदाच कॉन्फेडरेशन्ससारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे हा विजय मोलाचा आहे, असेही ते म्हणाले. 

पाचव्या मिनिटास ज्युलीयन ब्रॅंड याने गोल केल्यापासून जर्मनीचीच हुकमत होती; मात्र त्यानंतर त्यांच्या आक्रमकात गोल दवडण्याची काहीशी स्पर्धाच झाली. टॉमी रॉजिक याने ऑस्ट्रेलियास बरोबरी साधून देऊन जर्मनीस धक्का दिला; पण ड्रॅक्‍सिएर याने मध्यंतरास जर्मनीस आघाडीवर नेले. लिऑन गॉरेत्का याने जर्मनीची आघाडी वाढवली; तर टॉमी जुरीकने गोल करीत जर्मनीवरील दडपण वाढवले. सदोष नेमबाजीमुळे जर्मनीचे गोल वाढले नाहीत; पण त्यांनी गोलही होऊ दिले नाहीत. 

पूर्वार्धात जर्मनीने संधीच दिली नाही. त्यातच आम्ही चुका करीत त्यांचे काम सोपे केले. उत्तरार्धात खेळ चांगला झाला. काही वेळा तर आम्ही त्यांच्या तोडीचा खेळ केला; पण ते जगज्जेते का आहेत हेच त्यांनी दाखवून दिले, असे ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक अँगे पॉस्तेकॉग्लोऊ यांनी सांगितले.