स्पेनला सिद्ध करावी लागणार प्रगल्भता 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 June 2018

आव्हान संपुष्टात आलेल्या मोरोक्कोकडून अखेरच्या साखळी सामन्यात बरोबरीसाठीदेखील झुंजावे लागलेल्या माजी विजेत्या स्पेनला आता आपली प्रगल्भता सिद्ध करावी लागणार आहे. बाद फेरीत त्यांची गाठ यजमान रशियाशी पडणार आहे. 

कलिनीग्राड (रशिया) - आव्हान संपुष्टात आलेल्या मोरोक्कोकडून अखेरच्या साखळी सामन्यात बरोबरीसाठीदेखील झुंजावे लागलेल्या माजी विजेत्या स्पेनला आता आपली प्रगल्भता सिद्ध करावी लागणार आहे. बाद फेरीत त्यांची गाठ यजमान रशियाशी पडणार आहे. 

अखेरच्या साखळी सामन्यात दोन वेळा पिछाडीवर राहून त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. मोरोक्कोला 14व्या मिनिटाला बैटेब याने आघाडीवर नेले. त्यानंतर आठच मिनिटात इस्कोने बरोबरी साधली. त्यानंतर उत्तरार्धात युसूफच्या अफलातून हेडरने मोरोक्कोला पुन्हा आघाडीवर नेले. त्यानंतर भरपाई वेळेत राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या आस्पासने केलेला गोल पंचांनी नाकारला. मात्र, "वार'चा उपयोग करून घेत त्यांनी गोल आणि बरोबरी पदरात पाडली. 

आव्हान संपुष्टात आलेल्या मोरोक्कोकडून अनपेक्षित प्रतिकार सहन करावा लागल्यामुळे स्पेनला आता आपला खेळ उंचवावा लागणार आहे. बरोबरीने उरुग्वेशी त्यांनी लढत टाळली असली, तरी यजमानांविरुद्ध खेळताना त्यांना आतापर्यंत झालेल्या चुका पुन्हा करून चालणार नाहीत. 

स्पेनचा कर्णधार रामोसने सामन्यानंतर हीच भीती व्यक्त करून दाखवली. तो म्हणाला,""आम्ही बाद फेरी गाठली असली, तरी आम्हाला खेळ उंचवावा लागणार आहे. खेळाडूंनी या चुकातून बोध घेण्याची गरज असून वैयक्तिक कामगिरीला सांघिक कामगिरीची जोड देणे आवश्‍यक आहे.'' 

स्पेनने तीन सामन्यात पाच गोल स्वीकारले असून, रामोस, पिके, सिल्वा असा भक्कम बचाव असूनही तो परिपूर्ण ठरलेला नाही. मोरोक्कोविरुद्धही स्वीकारलेले गोल ही रामोसच्या ढिलाईपणाची शिक्षा होती. 

मोरोक्कोने संधी दवडली 
अखेरच्या सामन्यातून मोरोक्कोला गमाविण्यासारखे काहीच नव्हते. कमावले असते, ते फक्त स्पेनवरील विजयाचे समाधान; पण मोक्‍याच्या वेळी मिळविलेली संधी दवडल्यानेच त्यांना हे समाधानही मिळू शकले नाही. त्यामुळे 20 वर्षांनंतर मुख्य स्पर्धेत खेळताना त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. 

अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी स्पेनला दिलेली झुंज नक्कीच त्यांच्या खेळाला दाद देणारी होती. या सामन्यातून त्यांनी स्पेनला आपल्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करायला लावले, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spain needs to prove proficiency